देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 05:07 PM2024-09-27T17:07:46+5:302024-09-27T17:08:13+5:30
Devendra Fadnavis Office vandalized Update: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनात एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर तोडफोड करणाऱ्या या महिलेबाबत आता तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनात एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनासमोर लावलेली नेमप्लेट तोडल्याचे तसेच तिथे ठेवलेल्या कुंड्यांची मोडतोड केल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या महिलेचा शेध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर तोडफोड करणाऱ्या या महिलेबाबत आता तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या महिलेचं नाव धनश्री सहस्रबुद्धे असल्याचं समोर आलं आहे. तसेच ती मुंबईमधील एका उच्चभू सोसायटीमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेने पास न काढता सचिव गेटने मंत्रालयात प्रवेश केला होता. तसेच तिथे जात देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोरील नेमप्लेट आणि कुंड्यांची तोडफोड केली होती. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा तिथे सुरक्षेसाठी केवळ पुरुष पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे या महिलेला रोखता आले नव्हते. त्यानंतर काल रात्री उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांनी तपास करत या महिलेला शोध घेतला. तपासामध्ये आरोपी धनश्री सहस्रबुद्धे ही महिला मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचे समोर आले. तसेच ही महिला ज्या सोसायटीमध्ये राहते तिथल्या चेअरमननींही सदर महिला उच्चशिक्षित असून, मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने मागच्या दहा महिन्यांपासू सोसायटीमधील लोकांना त्रास देत असल्याचे सांगितले.
दरम्यान, धनश्री सहस्रबुद्धे या महिलेचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. मात्र सदर महिला ही पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. तिने घराचे दरवाजे बंद करून स्वत:ला आत कोंडून घेतलं आहे. त्यामुळे पोलिसांनी आता तिच्या मुंबईबाहेर असलेल्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना मुंबईत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.