मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू ?, 12 जिल्ह्यांना नाही सरकारमध्ये प्रतिनिधित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 06:35 AM2017-10-28T06:35:49+5:302017-10-28T06:36:43+5:30
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केल्याने, आता कोणाला घरी बसावे लागणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केल्याने, आता कोणाला घरी बसावे लागणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या वा दुस-या आठवड्यात फेरबदलाची शक्यता आहे.
विभागीय संतुलन पाहता, मुख्यमंत्री (नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन), वित्तमंत्री, सामाजिक न्याय, कृषी, ऊर्जा, उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती विदर्भाकडे आहेत. महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार व अन्न आणि नागरीपुरवठा सोडले, तर महत्त्वाची खाती पश्चिम महाराष्ट्राकडे नाहीत, तसेच संख्याबळही कमी आहे. हा राजकीय अनुशेष विस्तारात भरून काढला जाऊ शकतो. मराठवाड्यातील आठपैकी पाच जिल्ह्यांना प्रतिनिधित्वच नाही. हा अनुशेष सर्वाधिक आहे. एकाच वेळी विरोधी पक्ष व शिवसेनेशी सामना करीत, तिथे ताकद वाढविण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील मराठवाड्याचा टक्का वाढू शकतो. विदर्भातील एक-दोन मंत्र्यांना कामगिरीच्या आधारे वगळले जाऊ शकते. त्यात एका कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तसे झाल्यास विदर्भातून किमान दोन नवे चेहरे दिसू शकतील. मुंबईत विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यापैकी मेहतांवर संक्रांत येऊ शकते. मात्र, मुंबईला आणखी एक मंत्रिपद नक्की दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
पंकजा मुंडे व विद्या ठाकूर या दोनच महिला मंत्री आहेत. त्यातही ठाकूर यांना वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास नाशिक शहरातून महिला आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. या जिल्ह्यात भाजपाचा एकही मंत्री नाही.
>घरी बसविणे सोपे नाही
आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यावर निष्क्रियता व घोटाळ्याचे आरोप झाले. विनोद तावडे हेही काही प्रकरणात अडचणीत आले. प्रकाश मेहता, पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप झाले असले, तरी त्या सर्वांनाच घरी बसविणे सामाजिक वा इतर समीकरणांमुळे सोपे नाही. एक-दोघांना डच्चू देऊन इतरांची खाती बदलली जाऊ शकतात.
>उद्धव ठाकरेंनंतर खा. पटोले राहुल गांधींनाही भेटणार
भाजपाचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकºयांच्या मृत्यूंची चौकशी संयुक्त संसदीय समितीने करावी, या पटोले यांच्या मागणीचे ठाकरे यांनी समर्थन केले. आपण लवकरच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. -वृत्त/२
>एकनाथ खडसे यांच्या पुनरागमनाची शक्यता दिसत नाही. पुण्यातील जमीनप्रकरणी त्यांच्या चौकशीचा अहवाल अद्याप विधिमंडळात सादर होऊ शकलेला नाही. हे बघता क्लीन चिट न मिळताच ते मंत्रिमंडळात परततील, अशी चिन्हे नाहीत.
>उपरेपणाची भावना दूर करणार?
लोकसभा वा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१४ मध्ये अन्य पक्षांतून भाजपात आलेले जवळपास ३५ आमदार आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही मंत्रिपद नाही. त्यामुळे भाजपात येऊनही उपरेपणाची वागणूक दिली जात असल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे त्यापैकी एक-दोन जणांना संधी दिली जाऊ शकते. तथापि, आघाडी सरकारमध्ये मंत्री वा आमदार म्हणून प्रतिमा डागाळली होती, अशांना स्थान दिले जाणार नाही.
>यांना नाही प्रतिनिधित्व
सामाजिकदृष्ट्या विचार करता, माळी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही. एकही मुस्लीम मंत्री नाही.
>हे जिल्हे आहेत मंत्र्यांविना
रत्नागिरी, रायगड, वाशिम, भंडारा, वर्धा, सातारा, नंदुरबार, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड या १२ जिल्ह्यांना भाजपा वा शिवसेनेने मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वच दिलेले नाही. त्यातील काही जिल्ह्यांना निश्चितपणे संधी मिळेल.