काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 07:24 PM2020-02-23T19:24:17+5:302020-02-23T19:26:28+5:30

एल्गार परिषद आणि काेरेगाव भीमा येथील दंगल या दाेन वेगवेगळ्या केसेस असून यातील काेरेगाव भीमा येथील दंगलीबाबतच्या केसकडे दुर्लक्ष झाले आहे.

who made the riot at koregaon bhima is the question remain | काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान

काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान

googlenewsNext

पुणे : पेरणेफाटा येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात़ या घटनेला २०० वर्षे झाल्यानिमित्ताने अभिवादन कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले़ त्यातून कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी मोठी दंगल झाली़ त्याच्या आदल्या दिवशी पुण्यात शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषद झाली होती़ या एल्गार परिषदेवरुन आता राजकारण खुप तापले आहे. मात्र, त्यामुळे कोरेगाव भीमा येथील दंगल नेमकी कोणी घडविली की घडवून आणली, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या दंगलीमागे नेमका कोणाचा हात होता, याचा छडा लावण्याचे सर्वात मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांवर पर्यायाने राज्य शासनावर आहे. मात्र, राजकारणात नेमके त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली संदर्भात शिक्रापूर पोलिसांकडे एकूण २२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आतापर्यंत ११४ जण निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली होती. ते सर्व जण आता जामीनावर सुटले आहेत. या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात याबाबत एक स्वतंत्र सेल तयार करण्यात आला होता. या सेलमध्ये असलेल्या दोन्ही पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. त्यामुळे सध्या या सेलचे काम जवळपास ठप्प झाले आहे. या दंगलीत राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यु झाला होता. त्यातील आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. तो गुन्हा सध्या तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषणकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे.
 


गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या आठवड्यात पुण्यात आले होते. सहाजिकच एल्गार परिषदेवरुन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या तपासातील मतभिन्नतेवरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आले. गेले काही दिवस हा प्रश्न सातत्याने चर्चेला जात असताना गृहमंत्री म्हणून याबाबत अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली असताना तसेच एनआयएकडे एल्गारचा तपास देऊ नये, असा प्रस्ताव तयार करुन तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला होता. असे असताना त्यांना एल्गार आणि कोरेगाव भीमा हे दोन्ही वेगवेगळे गुन्हे आहेत, याची पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले होते.
 
कोरेगाव भीमाची दंगली ही घडविण्यात आल्याचा आरोप डाव्या पक्षांकडून सातत्याने केला गेला आहे. त्यातूनच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा दंगलीच्या गुन्ह्या मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती.ही दंगल घडविल्याचा आरोप करताना त्यातील अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे सांगितले जाते. १ जानेवारी पूर्वी गावातील घरांच्यावर, कमानीवर दगड आणून रचून ठेवले होते. तसेच १ जानेवारीला गावात बंद पाळण्याचे आवाहन करुन संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते, असे आरोप केले जात आहेत. त्यामागे नेमके कोण आहे, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही. 

एल्गार परिषदेत जाणिवपूर्वक तपास वेगळ्या दिशेने व काही जणांना त्रास देण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याचवेळी दोन वर्षे होऊनही कोरेगाव भीमा दंगलीचा तपास पूर्ण झाला नाही. पोलिसांनी जे आरोपी पकडले, ते सीसीटीव्हीत निष्पन्न झाले होते, त्यांच्यावर कारवाई झाली आहे.मात्र, त्यांना दंगली घडविण्यासाठी कोणी प्रोत्साहित केले, ते तेथे खरंचे आले होते की त्यांना आणले गेले होते, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही. यातील २२ गुन्ह्यांपैकी एकाचाही खटला अद्याप सुरु झालेला नाही़ एल्गारमध्ये ज्याप्रमाणे काही लोकांना जाणीवपूर्वक डांबले गेले असले म्हटले जाते. कोरेगाव भीमाची दंगल ही उजव्या विचाराच्या लोकांनी घडविल्याचा आरोपही केला गेला आहे. त्यामुळेच यातील सत्य पुढे येऊ नये, यासाठी हा तपास रेंगाळला गेला आहे का?  ही दंगल खरंच घडविली गेली असेल तर त्यामागील नेमके कोणाचे हात होते, हे सत्य बाहेर आणण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांबरोबरच राज्य शासनावर आहे. 

Web Title: who made the riot at koregaon bhima is the question remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.