‘तो’ मंत्री कोण रे भाऊ?

By admin | Published: January 21, 2015 11:10 PM2015-01-21T23:10:25+5:302015-01-21T23:56:14+5:30

बोथे जिलेटिन स्फोट : जयकुमार गोरे यांचा रोख नेमका कोणावर...

Who is the minister, who he is? | ‘तो’ मंत्री कोण रे भाऊ?

‘तो’ मंत्री कोण रे भाऊ?

Next

सातारा : माण तालुक्यातील बोथे जिलेटिन स्फोट प्रकरण आता वेगळ्याच चर्चेने रंगले आहे. येथील स्फोटाची सामाजिक तीव्रता कायम असतानाच आमदार जयकुमार गोरे यांनी त्यात आणखी एक ठिणगी टाकली आहे आणि याप्रकरणातील आरोपींना जामीन मिळावा म्हणून एक मंत्री दबाव आणत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.
बोथे जिलेटिन स्फोट प्रकरणात तेरा जणांवर गुन्हा नोंद झाला असून, यापैकी फक्त अंकुश गोरे याला अटक झाली आहे. अन्य दोन आरोपींना अटक झाली असली तरी ते तेरा आरोपींमध्ये नाहीत. आरोपींना अटक होत नाही म्हणून आ. गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला लक्ष्य करत आर्थिक तडजोडीचा आरोप केला. याचवेळी आरोपींना जामीन मिळावा म्हणून एक मंत्री दबाव आणत असल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आ. गोरे यांनी योग्य वेळी संबंधित मंत्र्यांचे नाव जाहीर करणार असल्याचे सांगितले. मात्र, तो मंत्री कोण याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.
बोथे जिलेटिन स्फोटात अंकुश गोरे यांना अटक झाल्यानंतर आ. जयकुमार गोरे यांनी पोलिसांवर आगपाखड केली. त्यांचा इशारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्याकडेच होता. आ. गोरे यांच्या मते ज्या कंपनीचा येथील स्फोटाशी संबंध नाही, त्या अंकुश गोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यापैकी अंकुश वगळता अन्य बारांपैकी एकालाही अटक झालेली नाही.
त्यामुळे आ. गोरे यांचा संताप होणे स्वभाविक आहे. गोरे यांचा पत्रकार परिषदेतील रोख हा अप्रत्यक्षरीत्या शेखर गोरेवरच होता. त्याच्यावरही कारवाई झालीच पाहिजे, असे त्यांनी फक्त एकदाच नमूद केले. मात्र, हे करत असताना बोथे स्फोटाशी अंकुश आणि ‘कमल एंटरप्रायजेस’चा काडीमात्र संबंध नाही, असे सांगायलाही विसरले नाहीत. (प्र्रतिनिधी)


पत्रकार परिषदेत असा झाला संवाद
आ. जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत राज्य शासनामधील एका मंत्र्यांवर त्याचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या आरोप केला. पत्रकारांनी हे मंत्री कोण, असे विचारताच त्यांनी त्याचे नाव नंतर जाहीर करणार असल्याचे सांगितले. याचवेळी याच खात्याचे मंत्री स्वत: मुख्यमंत्री असल्यामुळे मी त्यांना भेटणार आहे, असे स्पष्ट केले. यानंतर त्यांना पुन्हा एकदा पत्रकारांनी आपला या खात्याचे मंत्री म्हणून आपला रोख मुख्यमंत्र्यांकडे आहे का, असे छेडले असता त्यांनी फारसे बोलण्यास नकार दिला. माझ्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहत जात नसल्याची खंतही आ. गोरे यांच्या बोलण्यातून प्रत्येकवेळी दिसून आली.
लहान भाऊ शेखर गोरे यांच्यावर कारवाई होत नसल्याबद्दल पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आ. गोरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आगपाखड केली. त्यांनी दोन ते तीनवेळा ‘लोणंदहून स्थानिक गुन्हे शाखेत कोण येते..?’ याचा उल्लेख केला. यावरही त्यांना पत्रकारांनी ‘लोणंद’चा संदर्भ विचारला असता त्यांनी तुम्हीच त्याचा शोध घ्या, असे म्हणत विषयाला बगल दिली.


बोथे येथे जिलेटिन स्फोट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येथे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी आ. जयकुमार गोरे यांनी या अनुषंगाने तक्रार करताच जिल्हाधिकारी त्यांना म्हणाले ‘लेखी द्या...’ यामुळे झालेला संतापही पत्रकार परिषदेत जयकुमार गोरेंच्या चेहऱ्यावरून लपला नाही.

Web Title: Who is the minister, who he is?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.