मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण ?
By admin | Published: December 12, 2015 02:53 AM2015-12-12T02:53:24+5:302015-12-12T02:53:24+5:30
सौदी अरबियात भारताचे राजदूत म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे.
अहमद जावेद सौदीत राजदूत : पडसाळगीकर, माथूर, बोरवणकर, बर्वे, जयस्वाल या नावांची चर्चा
मुंबई : सौदी अरबियात भारताचे राजदूत म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे. ते लवकरच नवीन पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तथापि, गृह खात्यातील सूत्रांनुसार दत्ता पडसाळगीकर, सतीश माथूर आणि मीरा बोरवणकर यांच्या नावांची चर्चा आहे.
तथापि, या पदासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरील व्यक्तीची वर्णी लावण्याचे ठरल्यास संजय बर्वे (अतिरिक्त पोलीस महासंचालक -लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) व सुबोध जयस्वाल (रॉ-फ्रान्समध्ये प्रतिनियुक्ती) यांना पसंती दिली जाईल. मुंबईचे पोलीस आयुक्तपदासाठी दत्ता पडसाळगीकर नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली पसंती होती; परंतु त्यांनी त्या वेळीच नकार दिला होता. महासंचालक पदावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची परंपरा सरकारने कायम ठेवल्यास सतीश माथूर किंवा मीरा बोरवणकर यांचा पर्याय असेल. १९८१च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले माथूर हे सध्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे प्रमुख आहेत, तर बोरवणकर पोलीस महासंचालक (कायदा आणि तांत्रिक विभाग) आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे सरकारने ठरविल्यास सुबोध जयस्वाल आणि संजय बर्वे हे दोघे शर्यतीत असतील.