पुढील मुख्यमंत्री कोणाचा? भाजपा-शिवसेनेत पुन्हा जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 08:21 PM2019-06-22T20:21:24+5:302019-06-22T20:22:53+5:30
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील निकाल पाहावा असे सूचक विधान केले आहे.
मुंबई : शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा दावा पक्षाच्या मुखपत्रातून करण्यात आला होता. यावर मुख्यमंत्र्यांनीही आमचे ठरलेय, असे कार्यक्रमात सांगत एकत्र काम करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता भाजपाच्या नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्रीही भाजपाचाच होणार असल्याची वक्तव्ये सुरू केल्याने विधानसभेआधीच युतीचे वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
यावर आजच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील निकाल पाहावा असे सूचक विधान केले आहे. तसेच मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार आणि अशी सर्वांचीच इच्छा असल्याचे सांगत कोणी सांगण्याची गरज नसल्याचा टोला त्यांनी लगावला होता. त्यातच महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे यांनीही मुख्यमंत्री भाजपाचाच बसणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र प्रदेश भाजपाची बैठक आज दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांना संबोधित करताना सरोज पांडे यांनी शिवसेनेसोबत युती असली तरीही 288 मतदारसंघांमध्ये बुथ मजबूत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, महाजन यांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे ठरलेय असा राग पुन्हा आळवला. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे आधीच ठरले आहे. यामुळे दुसऱ्या कोणी यात तोंड खुपसू नये, असा इशारा ठाकरे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्रीपदापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.