परफॉर्मर म्हणून कोण पॉप्युलर?

By admin | Published: March 26, 2016 12:34 AM2016-03-26T00:34:49+5:302016-03-26T00:34:49+5:30

परफॉर्मर म्हणताच डोळ्यांसमोर येतात गायक वा गायिका, नर्तक वा नर्तिका, कोरियोग्राफर. भारतीय रंगभूमी, चित्रपट परिपूर्ण करण्यात या साऱ्यांचा खूपच मोठा वाटा असतो.

Who is Popular as a Performer? | परफॉर्मर म्हणून कोण पॉप्युलर?

परफॉर्मर म्हणून कोण पॉप्युलर?

Next

चला, निवड करू या...

मुंबई : परफॉर्मर म्हणताच डोळ्यांसमोर येतात गायक वा गायिका, नर्तक वा नर्तिका, कोरियोग्राफर. भारतीय रंगभूमी, चित्रपट परिपूर्ण करण्यात या साऱ्यांचा खूपच मोठा वाटा असतो. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कारासाठीच्या नामांकनांमध्ये आदम अली मुजावर, गणेश आचार्य, महेश काळे, पार्वती दत्ता आणि शंकर महादेवन यांचा समावेश असला तरी ज्युरींबरोबर लोकमतच्या वाचकांनीच भाग्यवंत निवडायचा आहे.
१) आदम अली मुजावर,
मिरज, जि. सांगली, रांगोळीकार
एक कलाध्यापक प्रदर्शनाच्या निमित्ताने रांगोळीकडे वळला आणि त्यांनी सहा वेळा रांगोळी रेखाटनातील विश्वविक्रमावर स्वत:ची मोहर उमटवली. रंगावलीकार आदम अली सुलतान मुजावर हे त्यांचे नाव. सांगली जिल्ह्याच्या मिरज पूर्व भागातले आरग हे त्यांचे गाव. सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयात प्रवेश घेतला. व्यक्तिचित्र आणि रेखाचित्र हे आवडीचे विषय. रंगावलीत नाव कमवायचे त्यांनी ठरवले. सलग ७२ तास राबून त्यांनी कृष्णाचा अर्जुनाला उपदेश हा प्रसंग ४० फूट बाय ५० फूट आकाराच्या रांगोळीतून साकारला. या रांगोळीची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. भगवान बाहुबलींची ५७ फूट उंचीची रांगोळी चितारली. शिवाजी महाराज रायगडावरून उतरतानाच्या देखाव्याची विश्वविक्रमात नोंद झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा १५० फूट बाय १०० फूट आकारात रेखाटली. या रांगोळीची नोंद गिनीज बुक, लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्, इंडिया बुक आणि एशिया बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये झाली. जहांगीर आर्ट गॅलरीपासून बॉम्बे आर्ट सोसायटीपर्यंत कित्येक प्रदर्शनांमध्ये त्यांच्या चित्रांचे कौतुक झालेय.
२) गणेश आचार्य,
मुंबई, कोरियोग्राफर
ज्यांच्या इशाऱ्यावर हिंदी चित्रपटांतील दिग्गज तारे थिरकतात, असे नाव म्हणजे गणेश आचार्य! बहिणीकडून नृत्याचे धडे घेत, त्यांनी वयाच्या १२व्या वर्षी नृत्य चमू स्थापन केला. एकोणिसाव्या वर्षी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. एकविसाच्या वर्षी त्यांना ‘अमन’ चित्रपटाच्या नृत्यदिग्दर्शनाची संधी मिळाली. ‘लज्जा’मधील ‘बडी मुश्किल’ गाण्यासाठी त्यांचे स्क्रीन पुरस्कारासाठी नामांकन झाले. ‘ओमकारा’मधील ‘बीडी’ या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘रंग दे बसंती’, ‘फिर हेराफेरी’, ‘गोलमाल’, ‘ओमकारा’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन त्यांनी केले. गोविंदावर चित्रित झालेल्या बहुतेक सर्व गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांनी ‘स्वामी’ या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनही केले. त्यांनी ‘मनी है तो हनी है’ची निर्मिती केली. अग्निपथ’मधील ‘चिकनी चमेली’, ‘बाजीराव- मस्तानी’मधील गाणी आणि मराठीतील ‘शिनेमा’मधील गाण्यांचे गणेश आचार्य यांनी केलेले नृत्यदिग्दर्शन अप्रतिम आहे.
३) महेश काळे, मुंबई, गायन
शास्त्रीय व विशेषत: नाट्यसंगीतात वेगळी छाप उमटवणारे लोकप्रिय नाव म्हणजे महेश काळे. सहाव्या वर्षी आई मीनल काळे यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. पुढे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्यत्व स्वीकारले. जवळपास आठ वर्षे गाणे शिकताना त्यांनी ठुमरी, दादरा, टप्पा, भजन या उपशास्त्रीय संगीताच्या प्रकाराबरोबरच नाट्यसंगीतही आत्मसात केले. पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिकची पदवी, तर अमेरिकेच्या सांता क्लारा युनिव्हर्सिटीतून इंजिनीअरिंग मॅनेजमेंटची मास्टर डिग्री त्यांनी मिळवली. पाश्चिमात्य देशांत भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसाराचा वसा त्यांनी घेतला आहे. सॅन फ्रॅन्सिस्को बे परिसरात ते जवळपास १०० मुलांना संगीताचे धडे देत आहेत. २०१०मध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकातील मध्यवर्ती भूमिका त्यांनी साकारली. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावेने साकारलेल्या ‘सदाशिव’च्या गाण्यांना आवाजही त्यांनी दिला.
४) पार्वती दत्ता, औरंगाबाद,
शास्त्रीय नृत्य
ओडिसी व कथ्थक या शास्त्रीय नृत्यप्रकारांत पारंगत पार्वती दत्ता केवळ कलाकार म्हणून नाही, तर कलेचा प्रचार-प्रसार, संशोधन, संवर्धन यांसाठीही सर्वश्रुत आहेत. दोन दशकांपासून ‘महागामी’ संस्थेच्या संचालिका आणि गुरू म्हणून त्यांचे कार्य चालू आहे. नृत्यात उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या ‘संगीत नाटक अकादमी’त प्रवेश घेतला. तेथे पं. बिरजू महाराजांकडून कथ्थक, तर गुरू माधवी मुद्गल आणि गुरू केलुचरण महापात्र यांच्याकडून ओडिसीचे प्रशिक्षण घेतले. पुढे ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस्’ येथे संशोधक म्हणून त्यांनी काम
केले. १९९३ मध्ये ‘गीतगोविंद’सारखा पहिला मल्टीमीडिया प्रोजेक्ट त्यांनी तयार केला. बीबीसी आणि जपानी
व ब्राझीलच्या टीव्ही चॅनेलने त्यांच्यावर माहितीपट बनवला आहे. युनेस्कोचा सांस्कृतिक पुरस्कार, देवदासी राष्ट्रीय पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार, नृत्यभूषण, भारत कलारत्न अशा पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.
५) शंकर महादेवन, मुंबई, गायन
हिंदी, मराठी, मल्याळी, कानडी अशा बहुभाषिक चित्रपटांतील एक हरहुन्नरी आवाज म्हणजे शंकर महादेवन! ते चेंबूरमध्ये वाढले, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत तसेच कर्नाटकी संगीताचे धडे घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी वीणावादनास सुरुवात केली. संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे महादेवन यांनी संगीताचे धडे गिरवले. इंजिनीअर असलेले महादेवन पॉप्युलर झाले ते ‘ब्रेथलेस’ अल्बममुळे. शंकर-एहसान-लॉय या त्रिकूटाने अनेक चित्रपटगीतांना संगीत दिले आहे. त्यांच्या ‘कल हो ना हो’ गाण्याला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या अ‍ॅकॅडमी’मध्ये हिंदुस्थानी, कर्नाटकी संगीत, लोकसंगीत, चित्रपट संगीत यांचे धडे दिले जातात. त्यांच्या दोन मुलांनीही हा वारसा पुढे चालू ठेवला आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘पंडित भानुशंकर शास्त्री’ या भूमिकेद्वारे महादेवन यांनी मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनयातही ठसा उमटवला आहे.

Web Title: Who is Popular as a Performer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.