किडनी तस्करीचा तपास रोखतय तरी कोण ?
By Admin | Published: August 12, 2016 04:06 AM2016-08-12T04:06:36+5:302016-08-12T11:56:04+5:30
किडनी तस्करी रॅकेट प्रकरणात आरोग्य संचालकांनी डॉक्टरांवर ‘होटा’(मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा) लावण्यास परवानगी न दिल्याने कोलंबोत (श्रीलंका) झालेल्या किडनी प्रत्यारोपणाचा तपास अडला आहे
सचिन राऊत, अकोला
किडनी तस्करी रॅकेट प्रकरणात आरोग्य संचालकांनी डॉक्टरांवर ‘होटा’(मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा) लावण्यास परवानगी न दिल्याने कोलंबोत (श्रीलंका) झालेल्या किडनी प्रत्यारोपणाचा तपास अडला आहे. ‘होटा’ लावण्यास परवानगी मिळताच अकोला पोलीस शासनाची परवानगी घेऊन श्रीलंकेत तपास करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कायद्याच्या अडचणी
अकोल्यातील दोघांच्या शस्त्रक्रिया कोलंबोतील रुग्णालयामध्ये झालेल्या आहेत. त्या ठिकाणी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास मुभा आहे. मात्र अकोला पोलिसांना तपासात प्रचंड अडचणी येत असून, त्यांनी श्रीलंकेतील तपास करण्यासाठी आधी ‘होटा’ लावणे आणि नंतर श्रीलंकेतील डॉक्टरांवर कारवाई करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. हा तपास करण्यात दोन देशातील कायद्याची अडचण येत आहे.
आरोग्य संचालकांची दिरंगाई
तत्कालीन आरोग्य संचालक सतीश पवार यांनी ४ ते ५ महिने परवानगी दिली नाही. त्यांचे निलंबन झाल्यावर आलेलया नवीन आरोग्य संचालकांनी ‘होटा’ लावण्यास परवानगी दिली. मात्र कुठे माशी शिंकली आणि त्यांनीही हे प्रकरण रेंगाळत ठेवल्याचे दिसून येत आहे.