आरोग्य संचालकांना पाठीशी घालणारे कोण?
By admin | Published: April 12, 2016 03:25 AM2016-04-12T03:25:53+5:302016-04-12T03:25:53+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा सोयीचा अर्थ काढून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे वरिष्ठ अधिकारी नेमके आहेत तरी कोण
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा सोयीचा अर्थ काढून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे वरिष्ठ अधिकारी नेमके आहेत तरी कोण, त्यांची नावे आणि माहिती तातडीने सादर करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गोरगरीब रुग्णांच्या औषधांमध्ये हेळसांड करताना संचालकांच्या पद राखण्याच्या प्रयत्नांची चर्चा दिवसभर विधिमंडळात होती.
संचालक होण्यासाठी पात्र नसताना सतीश पवार यांना ते पद दिले गेले होते. त्याविरोधात काही अधिकारी न्यायालयात गेले. ‘मॅट’पासून सर्वाेच्च न्यायालयापर्यंत सगळीकडे पवार यांना हार पत्करावी लागली. राज्य लोकसेवा आयोगामार्फत संचालकांचे पद भरा आणि ती नेमणूक होईपर्यंत पवार त्या पदाचे काम पाहतील, असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने पवार यांची याचिका फेटाळताना दिले होते. त्यानंतर एमपीएससीने संचालक पदासाठी जाहिरात दिली. त्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यामुळे सध्यातरी पवार हेच संचालक आहेत. अशावेळी या पदाचे अधिकार बजावत असताना त्याचे होणारे भलेबुरे परिणाम पवार यांनीच भोगणे अपेक्षित आहे. असे असूनही सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाची भीती दाखवत पवार यांच्यावर कारवाई करणे योग्य होणार नाही, असे वरिष्ठ अधिकारी मंत्र्यांना सांगत होते. शेवटी मंत्र्यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना बोलावून त्यांचे म्हणणे लेखी देण्याचे आदेश दिले.
दरम्यान, एमपीएससीचे निकाल जाहीर होताच त्यावर स्थगिती आणण्याची आणि पुन्हा सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत संचालक पदावर कायम राहण्याची खेळी खेळली जाईल असेही बोलले जात आहे.
संचालक पवार यांना वाचविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पडद्याआड जोरदार प्रयत्न चालू होते. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना अर्धसत्य माहिती सांगितली जात होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणालाही माफ करू नका, ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी कठोर भूमिका घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)