पवारांच्या पावसातील सभेमुळे चर्चेत आलेले साळुंखे मंडप डेकोरेटर्स आहे तरी कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 03:06 PM2019-10-19T15:06:37+5:302019-10-19T15:07:10+5:30
मुसळधार पावसात रिस्क घेऊन साउंड सिस्टीम चालवली. नुकसानही झालं, परंतु त्याचं काही दु:ख नाही. सोशल मीडियावर फोटो पाहून अनेकांचे फोन आले. मराठवाड्यातून देखील काहींचे फोन आल्याचे साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
- रवींद्र देशमुख
मुंबई - अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा पावसामुळे रद्द झालेल्या आपण नेहमीच पाहतो. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात मुसळधार पावसात घेतलेल्या सभेमुळे सोशल मीडियावर पवारमय वातावरण झाले आहे. तर पवारांच्या सभेला वापरण्यात आलेले डेकोरेटर्सही सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.
साताऱ्याचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि विधानसभेचे उमेदवार यांच्यासाठी आयोजित शरद पवारांच्या सभेत माईक आणि डेकोरेशनसाठी साळुंखे मंडप डेकोरेटर्सची सेवा घेण्यात आली होती. यावेळी वक्तत्याच्या डायसवर साळुंखे मंडप डेकोरेटर्स असं लिहिलेले होते. सोशल मीडियावर पवारांचा भाषण करतानाचा फोटो व्हायरल झाला असून या फोटोत साळुंखे मंडप डेकोरेटर्स असा डायस स्पष्ट दिसतो.
साताऱ्यातील भाषणानंतर शरद पवार फेसबुक आणि ट्विटरवर ट्रेंडमध्ये आले होते. तरुणांनी पवारांचा सभेतील फोटो डीपी, स्टेट्सला ठेवला आहे. त्यामुळे पवारांसह साळुंखे मंडप डेकोरेटर्स अनेकांच्या डीपीवर झळकत आहे. फेसबुकवर तर हॅशटॅग साळुंखे मंडप डेकोरेटर्सची असा सर्च देखील करण्यात येत आहे.
शंकर साळुंखे आणि ज्ञानेश्वर साळुंखे या बंधुंच्या मालकीचे असलेले साळुंखे मंडप डेकोरेटर्स मागील 20 वर्षांपासून साताऱ्यात कार्यरत आहे. शंकर साळुंखे म्हणाले की, शरद पवार भाषणाला येताच जोरदार पाऊस सुरू झाला. या कार्यक्रमासाठी महागड्या साऊंड सिस्टम लावण्यात आले होते. त्यामुळे सभा सुरू असतानाच नुकसान होईल याची कल्पना आली होती. परंतु, नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना न करता सभा व्यवस्थित कशी पार पाडता येईल, यावरच भर दिल्याचे साळुंखे मंडप डेकोरेटर्सचे प्रमुख शंकर साळुंखे यांनी सांगितले.
मुसळधार पावसात रिस्क घेऊन साउंड सिस्टीम चालवली. नुकसानही झालं, परंतु त्याचं काही दु:ख नाही. सोशल मीडियावर फोटो पाहून अनेकांचे फोन आले. मराठवाड्यातून देखील काहींचे फोन आल्याचे साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच अनेकदा पवारांच्या सभांसाठी काम केले असून उदयनराजे यांच्या सभेतही आपण सेवा दिल्याचे ते म्हणाले.