दगड कुणी मारले? पेटवापेटवी करण्यामागे कुणाचा हात?; नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:06 PM2023-09-02T16:06:57+5:302023-09-02T16:07:38+5:30
अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय तो आहे का? रघुनाथ शिंदे आणि अंबादास दानवे यांच्यात गेल्या २ दिवसांपासून काय बोलणे झाले आहे का? असा सवाल नितेश राणेंनी केला.
मुंबई – जालनातील मराठा आंदोलन शांततेत सुरू होते, त्याठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक प्रशासन त्यांच्याशी संपर्कात होते. मग त्यावेळी दगडी नेमकी कुणी मारली? मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले, पण कधीही कुणालाही त्रास न देता मोर्चे काढले गेले. रुग्णवाहिकेलाही मोर्चातून वाट दिली जायची. शिस्तप्रिय आणि शांततेने मोर्चा काढणारा आमचा मराठा समाज पोलिसांवर दगडफेक करेल हे मला वाटत नाही. मग ही दगडफेक कुणी केली? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी लावली आहे. त्यात सगळे बाहेर येणारच असा इशारा दिला आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, मराठा समाजाला कुणाला बदनाम करायचे आहे? मराठा आरक्षण हे राणे समितीने दिले. त्याला ताकदीने टिकवण्याचे काम कोर्टात आणि विविध स्तरावर देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा समाजाला याची जाणीव आहे. विरोधक फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न करतायेत. हे विरोधक जेव्हा मविआच्या काळात सरकारमध्ये होते. तेव्हा आरक्षणाची वाट लावण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारने केले होते. व्यवस्थित वकील द्यायचे नाहीत, प्रेझेंटेशन द्यायचे नाही. मराठा आरक्षणाची केस नाजूक कशी होईल यासाठी उद्धव ठाकरे सरकारने ताकद लावली होती. आज हे आमच्यावर आरोप करत आहेत अशी टीका नितेश राणेंनी महाविकास आघाडीवर केली.
तसेच सामना वृत्तपत्रात मराठा समाजातील माताभगिनींना हिणवण्याचे काम झाले, मूक मोर्चाचे मुका मोर्चा कार्टून छापले ते आमच्यावर टीका करतायेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजावर बोलू नये. मराठा आणि ओबीसी समाजात वाद कसा पेटवायचा हे काम मंत्री म्हणून वडेट्टीवार यांनी केले होते. दंगली कुणी पेटवल्या? कुणाल्या दंगली हव्यात? उद्धव ठाकरे, संजय राऊत हे बोलत आहेत. मग जालन्यात झालेल्या दंगलीबाबत तुम्ही बोलत होता का? छत्रपती संभाजीनगरमध्ये काही बसेस पेटवण्यात आल्या. ती माणसे कुणाची होती? रघुनाथ शिंदे कुणाचा माणूस आहे? अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय तो आहे का? रघुनाथ शिंदे आणि अंबादास दानवे यांच्यात गेल्या २ दिवसांपासून काय बोलणे झाले आहे का? या बसेस पेटल्या त्यामागे अंबादास दानवेंचा हात आहे का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणेंनी सरकारकडे केली आहे.
मराठा आरक्षण राणे समितीने दिले आणि त्याला देवेंद्रजी फडणवीस यांनी ते टिकवले. ठाकरे सरकारने कोर्टात चांगला वकील न देता मराठा आरक्षणची वाट लावली.#PCpic.twitter.com/H5w5tJ4kpz
— nitesh rane (@NiteshNRane) September 2, 2023
दरम्यान, एकाबाजूला सरकारवर टीका करायची दुसरीकडे पेटवापेटवी करायची. महाराष्ट्रातला हिंदू समाज जो एकत्र आलाय तो यांना बघवत नाही. औरंग्याला बाप समजणाऱ्यांची दुकाने बंद व्हायला लागलीत. मुघलांनी हिंदूच्या जातीजातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. तोच प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायेत. जिहादींच्या दाढी कुरवळणे हे यांचे धंदे आहेत. मराठा, ओबीसी समाजात वाद निर्माण होईल यासाठी प्रयत्न सुरू आहे. कलेक्टर, पोलीस आंदोलनकर्त्यांच्या संपर्कात होते. आंदोलन काल संपणार होते मग दगडी कुणी मारली? आज जे नेते तिथे चाललेत, ज्या मराठा आंदोलकांवर केसेस होतील त्यांच्यामागे उभे राहणार का? ज्यांची चूक नाही त्यांच्यावर केस नाही. मी आंदोलनकर्त्यांशी बोलणार आहोत. मराठा आरक्षणासाठी वर्षोनुवर्षे आम्ही लढतोय. मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हिंदू समाजाला टार्गेट केले जात असेल तर महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही आमदार नितेश राणेंनी दिला.