संसदेत आवाssssज कुणाचा? महाराष्ट्राचा...!
By admin | Published: July 18, 2016 01:50 PM2016-07-18T13:50:29+5:302016-07-18T13:52:55+5:30
संसदेत जनतेचे प्रश्न मांडणा-या खासदरांमध्ये महाराष्टाचे खासदार आघाडीवर आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून अरुणाचल आणि उत्तराखंडमध्ये झालेले सत्तांतर, समान नागरी कायद्याचा घातलेला घाट, भडकलेले कश्मीर यावरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व खडाजंगीतही देशातील जनतेला सतावणारे प्रश्न कोणता खासदार कळकळीने मांडणार? आणि प्रश्न सोडवणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेवर येऊन दोन वर्ष उलटून गेली असून या दोन वर्षांत अनेक खासदारांनी जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत. मात्र त्यामध्य सर्वात अव्वल आहेत महाराष्ट्रातील खासदार... विशेष म्हणजे पहिल्या पाच खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेच खासदार आहेत. पहिल्या स्थानावर आहेत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, त्यांनी सर्वाधिक म्हणजे ५६८ प्रश्न विचारले असून त्यांच्यामागोमाग कोल्हापूरचे राष्ट्रवादीचेच खासदार धनंजय महाडिक व सोलापूरचे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील अनुक्रमे दुस-या व चौथ्या स्थानावर आहेत. इंडिया स्पेंड अनालिसिसने ही माहिती जारी केली असून या १० खासदारांमध्ये भाजपाचा राज्य व केंद्रातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे ४, राष्ट्रवादीचे ३ आणि भाजपा व काँग्रसेच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. तसेच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही प्रश्न विचारण्यात आघाडी घेतली आहे.
महत्वपूर्ण बाब म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे वरीष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यासारख्या बड्या नेत्यांनी आत्तापर्यंत संसदेत एकही प्रश्न विचारलेला नसल्याचेही समोर आले आहे.
संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे देशातील १० खासदार
१) सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस, बारामती) – ५६८ प्रश्न
२) धनंजय महाडिक (राष्ट्रवादी काँग्रेस खासदार, कोल्हापूर ) – ५५७ प्रश्न
३) शिवाजी आढळराव पाटील (शिवसेना खासदार, शिरुर) – ५५४ प्रश्न
४) विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस खासदार, माढा, सोलापूर ) – ५३१ प्रश्न
५) राजीव सातव (काँग्रेस खासदार, हिंगोली ) - ५१९ प्रश्न
६) धर्मेंद्र यादव (समाजवादी पार्टी- उत्तरप्रदेश ) - ५१२ प्रश्न
७) आनंदराव अडसूळ (शिवसेना खासदार, अमरावती ) - ४९७ प्रश्न
८) डॉ. हीना गावित (भाजप खासदार, नंदुरबार ) - ४८० प्रश्न
९) राहुल शेवाळे (शिवसेना खासदार, मुंबई दक्षिण ) - ४७४ प्रश्न
१०) विनायक राऊत (शिवसेना खासदार, रत्नागिरी- सिंधुदुर्ग ) - ४७० प्रश्न