बदनामीमागील बोलविता धनी कोण?

By admin | Published: March 31, 2017 01:49 AM2017-03-31T01:49:39+5:302017-03-31T01:49:39+5:30

विधानसभेत बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणा-या सत्ताधारी पक्षाला विधानपरिषदेची अडचण होत आहे. त्यामुळेच अनिल गोटेंच्या माध्यमातून

Who is the wealthy behind defamation? | बदनामीमागील बोलविता धनी कोण?

बदनामीमागील बोलविता धनी कोण?

Next

मुंबई : विधानसभेत बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणा-या सत्ताधारी पक्षाला विधानपरिषदेची अडचण होत आहे. त्यामुळेच अनिल गोटेंच्या माध्यमातून विधानपरिषदेचा अवमान करण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. सत्ताधारी भाजपाच्या मनात जे आहे तेच आता अनिल गोटेंच्या मुखातून बाहेर पडत आहे. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षांनी समज दिल्यानंतरही गोटेंनी आपली वक्तव्ये चालू ठेवल्याचा आरोप विरोधकांनी गुरुवारी विधान परिषदेत केला.
विधानसभेतील भाजपा सदस्य अनिल गोटे यांनी विधान परिषद बरखास्त करण्याची मागणी केली होती. विधानसभेतील विधेयके अडविण्याचे काम परिषदेत होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचे तीव्र पडसाद परिषदेत उमटले. आ. गोेटे ठरवून सभागृहाचा आणि सभापतींचा अवमान करत आहेत. विधानपरिषदेला घटनात्मक अधिकार नाहीत. अप्रत्यक्षपणे निवडून आलेली मंडळी लोकशाहीची गळचेपी करतात, अशी विधाने ते करीत आहेत. सरकारच्या पाठबळाशिवाय ती अशी भाषा करु शकत नाहीत. विधानपरिषद बरखास्त व्हावी अशी भाजपा नेत्यांची इच्छा आहे का, विधानपरिषदच नको असेल तर आम्ही इथे कामकाज तरी कशाला करायचे, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. सरकारने भूमिका स्पष्ट करावी तोपर्यंत सभागृह चालणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला.
यावेळी झालेल्या चर्चेत काँग्रेसचे शरद रणपिसे ,जनार्दन चांदूरकर, राष्ट्रवादीचे किरण पावसकर आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी गोटे यांच्या टिकेची झोड उठवली.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. अनिल गोटे यांच्या विधानाशी सरकारचा संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. तरीही त्यांनी समज द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर, विधान परिषदेचे घटनात्मक अस्तित्व आणि महत्व असल्याचे तावडे म्हणाले. खालच्या सभोगृहातील काही विधेयके आम्ही संमत होऊ देणार नाही अशी भाषा वरच्या काही सदस्यांनी अनिल गोटे यांच्याशी खासगीत बोलताना वापरली होती. त्यामुळे गोटे त्यांच्या जागी बरोबर असल्याचे विधान तावडे यांनी केले. त्यांच्या विधानावर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. हा तिढा न सुटल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

Web Title: Who is the wealthy behind defamation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.