लोकांच्या असंख्य प्रश्नांना उत्तरे कोण देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 03:07 AM2016-11-10T03:07:17+5:302016-11-10T03:07:17+5:30
बँक नक्की बंद आहे का? एटीएममध्ये पैसे असूनही ते बंद का आहे? उद्या तरी सर्व सुरू राहणार आहे का? इमर्जन्सी असेल तर आम्ही पैसे कुठून काढायचे?
ठाणे : बँक नक्की बंद आहे का? एटीएममध्ये पैसे असूनही ते बंद का आहे? उद्या तरी सर्व सुरू राहणार आहे का? इमर्जन्सी असेल तर आम्ही पैसे कुठून काढायचे? आमच्याकडच्या हजार-पाचशेच्या नोटा नक्की घेतल्या जाणार ना? अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार बुधवारी ठाण्यातील अनेक एटीएम, बँकांच्या बाहेर सुरू होता आणि त्याला तोंड देत होते, कंत्राटी पद्धतीने १२ तासांकरिता नियुक्त केलेले सुरक्षारक्षक. सुट्या पैशांअभावी लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टांची अभिव्यक्ती एखादी शिवी हासडून केली जात होती किंवा एखादा एटीएम मशीनवर बुक्की घालून नापसंती व्यक्त करीत होता.
पंतप्रधान मोदी यांनी नोटा रद्द केल्याची घोषणा करताच मंगळवार रात्रीपासून एटीएमबाहेर लांबचलांब रांगा लागल्या होत्या. प्रारंभी सुटे पैसे मिळवण्यात काहींना यश आले. मात्र, काही वेळातच मशीनमधील पैसे संपले. ज्यांना मंगळवारी रात्री पैसे मिळाले नाहीत ते किंवा ज्यांच्याकडील सुटे पैसे संपल्याने चणचण भेडसावू लागली, ते बुधवारी सकाळपासून एटीएमबाहेर घिरट्या घालून ‘लक असेल आणि मिळाले पैसे तर बघू’ या विचाराने येत होते. सकाळी ९ ते १० दरम्यान एटीएमच्या बाहेर गर्दी होती. एटीएम बंद असल्याचे सुरक्षारक्षकाने सांगूनही काही जणकार्ड टाकून खातरजमाआणि आपली नाराजी प्रकट करत होते. दररोज बँकेत पायधूळ झाडणारे छोटे व्यापारी, दुकानदार हेही आले होते. घोळक्याघोळक्यांत उभे राहून चर्चा करीत होते. ‘काळापैसा बाहेर काढण्याकरिता निर्णय चांगला आहे, हे खरे पण सामान्य माणसाला या निर्णयामुळे किती त्रास होत आहे, ते मोदींना कळत नाही’, असा सूर काहींनी लावला होता. ‘घरी हजार-पाचशेच्या चार नोटा असल्या तरी त्या बदलण्यासाठी कामधंदे सोडून आता उद्या बँकेत धावत यावे लागणार. आज बँका बंद न करता आजपासूनच सुटे पैसे देण्याचे नियोजन अगोदर केले असते, तर लोकांचे हाल झाले नसते’, असाही मतप्रवाह होता.
काही महिला, गोरगरीब कामगार हजार-पाचशेच्या नोटा घेऊन बँकेपाशी आले व त्यांनी तेथील सुरक्षारक्षकांना या नोटा बदलून मिळणार की नाही, असा भयकंपित स्वरात सवाल केला. त्यांची समजूत काढताना व त्यांना उत्तरे देताना सुरक्षारक्षकांची पुरेवाट होत होती. कुणाला क्लासची फी भरायला पैसे हवे होते, तर कुणाला डॉक्टरकडे जाण्याकरिता पैशांची गरज होती. मात्र बँक, एटीएम बंद असल्याने हताश होऊन ते परत जात होते. किरकोळ भाजी-फळविक्रेते सुटे द्यायला तयार नाही. पाचशेची नोट ठेवून घेताहेत आणि काय करायचं, बायकांच्या घोळक्यात चर्चा सुरू होती. उद्या तरी मिळतील ना रे पैसे, असा सवाल त्या रक्षकांना करीत होत्या.
एरव्ही, एटीएम बंद असले तरी कधी आम्हाला इतका त्रास होत नाही. काल रात्री उशिरापर्यंत लोकांच्या रांगा लागल्या होत्या. लोकांची भांडणे सोडवताना आमची पुरेवाट झाली. आज मशीन बंद असल्याने लोकांची बोलणी खातोय. खूपच त्रास झालाय. लोक आमच्यावरच राग काढत आहेत, अशी खंत एटीएमबाहेरील सुरक्षारक्षकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)