याद्याच लावल्या नाहीत तर अर्ज करणार कोण?, जरांगे पाटील यांचा शिष्टमंडळाला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 10:13 AM2024-01-19T10:13:15+5:302024-01-19T10:14:02+5:30
आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, विभागीय उपायुक्त गव्हाणे यांनी गुरुवारी सायंकाळी जरांगे पाटील यांची भेट घेऊन सगेसोयरे अध्यादेश आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चर्चा केली.
जालना : कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा बांधवांच्या नावाच्या याद्याच गावागावांत लावलेल्या नाहीत तर अर्ज कोण करणार, असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला केला.
आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, विभागीय उपायुक्त गव्हाणे यांनी गुरुवारी सायंकाळी जरांगे पाटील यांची भेट घेऊन सगेसोयरे अध्यादेश आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चर्चा केली.
त्यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठवाड्यातील सात हजार गावांतील कागदपत्रांची तपासणी केलीच नाही. निजामकालीन गॅझेट वापरले जात नाही. २२ जानेवारीपर्यंत प्रमाणपत्र दिल्याचा डेटा द्या, सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश जारी करा. तेथून गुलालाच्या ट्रक घेऊन मुंबईत येऊ. सरकारवर गुलाल उधळू.
आ. कडू यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
जरांगे यांनी काही सरपंचांना थेट फोन करून आमदार कडू यांच्याशी संवाद साधून दिला. समोरून येणारी उत्तरे पाहता आमदार कडू यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. विभागीय आयुक्तांनी पत्रक काढले मात्र गावागावात याद्या लावल्या नाहीत.