कोण ठरणार बाजीगर ?
By admin | Published: March 23, 2016 04:20 AM2016-03-23T04:20:01+5:302016-03-23T04:20:01+5:30
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कारासाठी बिझनेस विभागात श्रीकांत बडवे, बी.के. गोएंका, डॉ. आनंद देशपांडे, सौरभ गाडगीळ आणि संजीव पेंढारकर यांची नामांकने जाहीर झाली आहेत
मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कारासाठी बिझनेस विभागात श्रीकांत बडवे, बी.के. गोएंका, डॉ. आनंद देशपांडे, सौरभ गाडगीळ आणि संजीव पेंढारकर यांची नामांकने जाहीर झाली आहेत. बिझनेस म्हटले की त्यात व्यवसाय आणि उद्योग या दोन्हींचा समावेश होतो. व्यवसाय वा उद्योग सुरू करणे, टिकवणे, वाढवणे आणि हे करताना आपल्या उत्पादनांविषयी ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणे महत्त्वाचे असते. यंदाच्या तिसऱ्या पर्वातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयनांना प्रगतीपथावर नेणाऱ्यांमधून लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया लोकमतच्या संपादकीय चमूने केलेले मंथन, राज्यभरातील कोटय़वधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून साकारत आहे. या प्राथमिक निवडीतून अंतिम विजेते निवडण्याचा मान आहे तुमचा!
‘लोकमत’च्या संपादकीय मंडळाने बिझनेस विभागासाठी अशाच मंडळींची नामांकनासाठी निवड केली असून, त्यांची माहिती अशी : बडवे ग्रुप
- श्रीकांत बडवे,
अध्यक्ष आणि
व्यवस्थापकीय संचालक
बडवे ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे. औरंगाबाद येथील जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेजमधून १९८७ साली इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवी प्राप्त केल्यानंतर बडवे यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करावा असं वाटलं. स्वयंचलित वाहनांची निर्मिती व गृहोपयोगी उपकरण निर्मिती क्षेत्रांसाठी सुटे भाग निर्माण करणाऱ्या अग्रमानांकित उत्पादकांमध्ये आज बडवे ग्रुपची ओळख आहे. बजाज आॅटोच्या आॅर्डर्स मिळाल्यापासून त्यांच्या प्रगतीचा आलेख चढत गेला. रोबोटिक्स आणि अनेक विथ सर्फेस ट्रीटमेंट्सच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे शिटमेटल, फॅब्रिकेटेड, प्लास्टिक मोल्डेड अशा विविध प्रकारच्या सुट्या भागांचे बडवे ग्रुपतर्फे उत्पादन केले जाते. दोनचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांच्या निर्मितीसाठी लागणारे सुटे भाग ग्रुप पुरवितो. बजाज आॅटो लि., टाटा मोटर्स लि., होंडा मोटर्स लि., अशोक लेलँड लि., महिंद्रा टू व्हीलर्स लि., एलजी इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी दिग्गज कंपन्या बडवे ग्रुपच्या सन्माननीय ग्राहकांपैकी आहेत. बडवे ग्रुपचा व्याप आता उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू असा पसरला आहे. १९९७ मध्ये बडवे यांना गुणवत्ता सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारण्याचा बहुमान मिळाला. अनेक व्यवस्थापनविषयक व व्यावसायिक संघटना, जायन्ट्स क्लब सेवा केंद्र, भारतीय विद्याभवन इत्यादी संस्थांचे सक्रिय सदस्य आहेत. वृक्षसंवर्धन व कचरा निर्मूलन व्यवस्थेमध्येही बडवे ग्रुपने वाटा उचलला आहे. पर्सिस्टंट सिस्टीम्स
- डॉ. आनंद देशपांडे, संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
डॉ. आनंद देशपांडे यांनी ‘आयआयटी’ खरगपूर येथून १९८४ या वर्षी ‘संगणक विज्ञान’ व ‘अभियांत्रिकी’ या विषयात ‘बी.टेक.’ पदवी मिळविली. पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इंडियाना युनिव्हर्सिटीमधून त्यांनी १९८६ या वर्षी पदव्युत्तर शिक्षण व त्यानंतर १९८९ मध्ये पी.एचडी. मिळविली. कॅलिफोर्नियातील हेवलेट पॅकर्ड लॅबोरेटरीजमध्ये त्यांनी १९८९ ते ९० या काळात काम केले. आपल्या शिक्षणाचा उपयोग देशाला व्हावा यासाठी ते १९९0 मध्ये भारतात परतले. देशाची आर्थिक परिस्थिती काहीशी अस्थिर असली, तरी सॉफ्टवेअर विकसित करून त्यांचे ‘आऊटसोर्सिंग’ करण्यास मोठा वाव असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ‘पर्सिस्टंट’ची स्थापना केली. अमेरिकेत जमा झालेली दोन लाख रुपयांची पुंजी व १ लाख ६० हजारांचे कर्ज घेऊन त्यांनी ‘पर्सिस्टंट’ची सुरुवात केली. गेल्या वर्षी कंपनीने तब्बल १,४९९ कोटी रुपयांची उलाढाल केली. सॉफ्टवेअर आऊटसोर्सिंग क्षेत्रात जगात अग्रेसर असलेल्या या कंपनीची जगातील तीन खंडांत कार्यालये असून, चार हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत.पी.एन. गाडगीळ
- संचालक, सौरभ गाडगीळ
सोने-चांदी व्यवसायातील एक विश्वसनीय नाव म्हणजे पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स. १८ व्या शतकात व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे कंपनीचे संस्थापक पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांच्याच नावे कंपनी ओळखली जाते. १७५ वर्षांच्या कारकिर्दीत उच्च प्रतीचे आणि शुद्ध सोन्याची खात्री असा लौकिक असलेल्या पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सचे नाव आज घराघरात आहे. एक दुकान ते अनेक शाखा असा कंपनीचा प्रवास आदर्शवत आहे. केवळ सोन्याची विक्री नव्हे, तर सुबक, नक्षीदार दागिन्यांची निर्मिती, देवदेवतांच्या मूर्तींची घडण, यामुळे सामान्यांच्या घरांपासून राजघराणी, मोठे बिझनेस हाऊस, अशा सर्वच ठिकाणी गाडगीळ ज्वेलर्सचा उल्लेख होतो. सणासुदीला गाडगीळांच्या दुकानात केलेली सोनेखरेदी शुभ मानली जाते. त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये सुरू केलेली शाखा म्हणजे तेथील भारतीयांसाठी शुद्धता व गुणवत्तापूर्ण दागिन्यांची सोयच म्हणता येईल.वेल्सपन ग्रूप - सूत-वस्त्रनिर्मिती (टेरी टॉवेल) च्या निर्मितीत देशात अग्रेसर असलेल्या व आशियात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वेल्सपन इंडिया लि. कंपनीने आता महाराष्ट्र व अन्य राज्यांसह परदेशातही वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उत्पादनाच्या ९४ टक्के माल कंपनी ३४ देशांत निर्यात करते. यापैकी ६८ टक्के निर्यात ही अमेरिकेत, युरोपात २३ टक्के, तर उर्वरित मध्यपूर्व, आॅस्ट्रेलिया, मॉरीशस आदी देशांत होते. अत्युच्च दर्जाच्या सुतापासून विविध व आकर्षक डिझाइनमध्ये टॉवेलची निर्मिती करणे ही कंपनीची खासियत. टॉवेल, बेडशीट, फॅशन बिडिंग अशा अनेक उत्पादनांच्या निर्मिती व विक्रीत कंपनी अग्रेसर आहे. अमेरिकेत या कंपनीचा बोलबाला आहे. गुजरातमध्ये कंपनीची स्टेट आॅफ द आर्ट पद्धतीचा कारखाना असून, या क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठा असा हा कारखाना आहे.
बी.के. गोएंका अध्यक्ष असलेल्या वेल्सपन इंडिया ही कंपनी वेल्सपन समूहाचा भाग आहे. वेल्सपन समूह आंतरराष्ट्रीय पातळीवर स्टील, ऊर्जा, टेक्सटाईल आदी क्षेत्रांतील एक बहुराष्ट्रीय व मोठी कंपनी म्हणून गणली जाते. सुमारे ५० देशांत कंपनीचा कारभार असून २४ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कंपनीत जागतिक पातळीवर कार्यरत आहेत.विको लॅबोरेटरीज्
संजीव पेंढारकर, संचालक
भारतीय आयुर्वेदशास्त्र उत्पादनांच्या रूपाने जगात पोहोचवण्यात विको कंपनीचे मोठे योगदान आहे. १९५२ साली के.व्ही. पेंढारकर यांनी विकोची स्थापना केली. डोंबिवली, नागपूर व गोव्यात सुरुवातीला कार्यान्वित असलेल्या विकोचा विस्तार जी.के. पेंढारकर यांच्या काळात झाला. कंपनीने देशभरात पाय रोवल्यावर परदेश भरारी घेतली. आज आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका, आॅस्ट्रेलिया अशा सर्व खंडांतील प्रमुख देशांत कंपनीचे अस्तित्व आहे. कंपनीच्या स्वत:च्या विविध ठिकाणी शाखा असून, १३ सहयोगी कंपन्या आहेत. वैद्यकीय उपचार पद्धतीत आयुर्वेदाचा वापर हा औषधाच्या रूपाने मुख्य प्रवाहात आणण्यात कंपनीचे मोठे योगदान आहे. आयुर्वेद शास्त्र प्राचीन असले, तरी त्याच्या अर्धवट प्रसारामुळे या शास्त्राबद्दल संभ्रम होते. त्यामुळे टूथपेस्ट, टाल्कम पावडर अशा उत्पादनांच्या माध्यमातून विकोने हा संभ्रम दूर केला. देशातच आणि परदेशात ब्रॅण्डची ओळख निर्माण करण्यात विकोला यश आले आहे. त्यांची सर्व उत्पादने आयुर्वेदातील आहेत. यात आपण काहीही नवे शोधले नसल्याची विनम्र भूमिका कंपनीने नेहमीच घेतली आहे. त्यांनी भारतीय आयुर्वेदाचे अस्तित्व टिकवतानाच त्यावर शास्त्राची आणि जनतेची मोहर उमटविण्याचे काम विको समूहाने केले आहे.