शिवसेनेत मराठवाड्यातून मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 04:17 PM2019-12-24T16:17:56+5:302019-12-24T16:18:15+5:30
पैठण मतदारसंघातून पाचव्यांदा निवडणून आलेले शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.
मुंबई: राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. तर मराठवाड्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर यासाठी अनेक नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.
यात काँग्रेसमधून शिवसेनेत येऊन सिलोडमध्ये आमदार झालेले अब्दुल सत्तार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सत्तार हे या आधी सुद्धा आघाडी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले आहे. तसेच शिवसेनेत ते एकमेव मुस्लीम आमदार आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संधी देऊ शकतात.
तसेच सत्तार यांच्या नावाबरोबर पैठण मतदारसंघातून पाचव्यांदा निवडणून आलेले शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून भुमरे यांची पक्षात ओळख असून, ते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
या सोबतच उस्मानाबादमधून तानाजी सावंत, परभणीचे राहुल पाटील यांचं नावही चर्चेत आहे. तसेच शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडे मागणी केली असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. मात्र ऐनवेळी कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.