शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी सात नावं चर्चेत; आज शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 10:42 AM2019-05-27T10:42:21+5:302019-05-27T10:56:44+5:30

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Who will become minister from Shiv sena quota ? Important meeting today at Matoshree | शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी सात नावं चर्चेत; आज शिक्कामोर्तब

शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी सात नावं चर्चेत; आज शिक्कामोर्तब

Next

- मनोहर कुंभेजकर


मुंबई : शिवसेनेतील वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेले शिवसेना नेते व सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार गजानन कीर्तिकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पहिल्या टप्प्यात काही ठरावीक मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 5 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलवल्याचे समजते.

या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री तसेच लोकसभेचे उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा अडीच लाख मतांनी दणदणीत पराभव केला आहे. वयाने व अनुभवाने कीर्तिकर ज्येष्ठ आहेत. शिवसेनेतील असलेला त्यांचा प्रदीर्घ अनुभव, स्थानीय लोकाधिकार समितीचा वटवृक्ष करण्यात त्यांचा असलेला सिंहाचा वाटा आहे. तसेच गेल्या लोकसभेतील प्रभावी कामगिरी पाहता त्यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतर्फे  कीर्तिकर, राज्यसभा खासदार संजय राऊत, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, यवतमाळच्या खासदार भावना गवळी, राज्यसभा खासदार अनिल देसाई, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. संजय राऊत व कीर्तिकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते.

सिंधुदुर्गलाही मिळणार केंद्राची ताकद

दैनिक सामन्याचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा पिंड हा पत्रकारितेचा आहे. जर त्यांना मंत्रीपद मिळाले तर त्यांना कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा द्यावा लागेल. तर मागील मोदी सरकारमध्ये दिल्ली विमानतळावरून मातोश्रीच्या आदेशाने परत यावे लागलेले राज्य सभा खासदार अनिल देसाई यांचे मंत्रीपद हुकले होते. मात्र, आता त्यांची मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग येथील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि कोकणात शिवसेनेला अधिक मजबूत करण्यासाठी विनायक राऊत यांचा विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे. यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचा खासदार म्हणून प्रदीर्घ अनुभव आहे. शिवसेनेतील एकमेव महिला खासदार म्हणून त्यांना संधी मिळू शकते. तर कामगार नेते, आमदार व सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे अरविंद सावंत यांच्या नावाचा सुद्धा विचार होण्याची शक्यता आहे.

Web Title: Who will become minister from Shiv sena quota ? Important meeting today at Matoshree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.