रावेरमधून रक्षा खडसेंविरोधात कोण लढणार? रोहिणी खडसे की... एकनाथ खडसेंनी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 04:28 PM2024-03-15T16:28:28+5:302024-03-15T16:30:08+5:30
Raver Lok Sabha Constituency: रावेर लोकसभा मतदारसंघातमधून भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या विरोधात रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जाईल, असा दावा करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपा कुणाला उमेदवारी देणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या सर्व शक्यतांना पूर्णविराम देत भाजपाने येथून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले पक्षाचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी कोंडी केल्याचे बोलले जात होते. मात्र येथून शरद पवार गटातर्फे रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जाईल, त्यामुळे रावेरमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगेल, असा दावा करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे.
एकनाथ खडसे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मला डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही. तसेच रोहिणी खडसे ह्यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कधीही विचार केला नव्हता. त्या केवळ विधानसभा निवडणूक लढवायची आहे, असा विचार करून मागच्या चार-पाच वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे रोहिणी खडसे ह्या सुद्धा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांनी केलेल्या या घोषणेमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे कुटुंब आमने-सामने येईल, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. तसेच येथून निवडणूक लढवण्यासाठी पक्षामधील सात ते आठ उमेदवार इच्छूक आहेत. त्या उमेदवारांची आज शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती घेण्यात आली. तसेच यापैकी काही उमेदवारांची छाननीही करण्यात आली. आता त्यामधून योग्य उमेदवाराची निवड ही उद्या होण्याची शक्यता आहे, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.