बंद ‘घड्याळा’ला चावी कोण देणार?

By admin | Published: October 21, 2014 12:52 AM2014-10-21T00:52:24+5:302014-10-21T00:52:24+5:30

गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीने मोठमोठे बिल्डर, व्यावसायिक, कंत्राटदार पक्षाशी जोडले. पण जनसमर्थन असलेले दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते पक्षाशी जोडले नाहीत. तसा पुढाकारही कुणी घेताना दिसले नाही.

Who will give the keys to 'watch' off? | बंद ‘घड्याळा’ला चावी कोण देणार?

बंद ‘घड्याळा’ला चावी कोण देणार?

Next

नेते मतदारसंघात खूश : जनसमर्थन असलेले कार्यकर्ते दूरच
नागपूर : गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीने मोठमोठे बिल्डर, व्यावसायिक, कंत्राटदार पक्षाशी जोडले. पण जनसमर्थन असलेले दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते पक्षाशी जोडले नाहीत. तसा पुढाकारही कुणी घेताना दिसले नाही. त्यामुळे पक्षात गर्दी वाढली, पण पक्षासाठी मतांची गर्दी वाढली नाही. जे ‘ताकद’वर होते, मागे-पुढे करणारे होते त्यांनाच पुण्या-मुंबईतील नेत्यांचे अधिक पाठबळ मिळाले. पण सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यात नेते कमी पडले. मग पक्ष वाढणार कसा? जेव्हा राजकीय लढाई लढायची असते तेव्हा कार्यकर्तेच कामी येतात. हितसंबंधापोटी पक्षात घुसखोरी करणारी माणसे अशा लढाईच्या वेळीच बिळात घुसतात. तसे झालेही. दोन माजी मंत्र्यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या उर्वरित उमेदवारांना मिळालेली मते पाहिली तर असा काही पक्ष नागपुरात आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आता या बंद पडलेल्या ‘घड्याळा’ला वेळीच चावी देण्याची गरज आहे. त्यासाठी नेत्यांनी गटबाजी दूर सारून पक्षाचे काम करणाऱ्यांना पाठबळ देण्याची गरज आहे.
राष्ट्रवादीचे नेते येऊन-जाऊन ‘फिफ्टी-फिफ्टी’ची भाषा करायचे. शहर जिल्ह्यात आपली ताकद वाढली आहे, असा विश्वास नेत्यांना द्यायचे. नेत्यांनीही त्यावर विश्वास ठेवला. काँग्रेसशी आघाडी तोडत प्रत्येकाला ताकद दाखविण्याची संधी दिली. पण नागपुरात या संधीने अनेकांचे पितळ उघडे पाडले. आपल्या पक्षाची किती ताकद आहे, हे स्थानिक नेत्यांना चांगलेच ठाऊक होते. पण कुणीच वास्तवाचा विचार केला नाही. आता विधानसभा निवडणुकीने उपराजधानीत राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती पोलखोल केली आहे. नागपूर शहरात दिग्गज नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व केले. पण खऱ्या अर्थाने पक्ष सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणे त्यांना जमले नाही. पक्षाचा बिल्ला लावायचा अन् राजकीय तडजोडी करायच्या, यामुळे पक्ष जनसामान्यांत रुजला नाही. आधीच छोटेखानी संघटन अन् त्यातही सतराशेसाठ भानगडी, हेवेदावे. ही सोंगे पाहून अनेकांनी पक्षाचा मार्ग सोडला.
नागपूर ग्रामीणमधील राष्ट्रवादी अनिल देशमुख व रमेश बंग या दोन माजी मंत्र्यांच्या गटात विभागली आहे. तर शहर राष्ट्रवादी अजय पाटील व पाटील विरोधक अशा दोन गटात वाटल्या गेली आहे. विशेष म्हणजे या वाटणीवरही देशमुख-बंग गटबाजीचीच छाया आहे. ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. एखाद्या शहर अध्यक्षाला करू द्या मुक्तपणे काम, घेऊ द्या निर्णय, अशी ठोस भूमिका कुणीच घेताना दिसले नाही. जिल्हा परिषद, महापालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. मात्र, या निवडणुकीत कार्यकर्त्यांना पाहिजे तसे बळ पक्षाकडून मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व महापालिकेतही राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले.
स्थानिक पातळीवर सक्षम कार्यकर्तेच नसतील तर पक्षाची वाढ होणार तरी कशी? नेते एवढ्यावर थांबले नाही. जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याचा पुण्यातून आदेश आला आणि नेत्यांनी होकारार्थी मान डोलावली. अनिल देशमुख, रमेश बंग यापैकी कुणीही या निर्णयाला उघड विरोध केला नाही. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला एखाद दुसरे पद मिळाले, पण भाजपने अध्यक्षपद स्वत:कडे घेऊन जिल्ह्याचा कारभार चालविला. गावोगावच्या भाजप कार्यकर्त्याला पाठबळ दिले आणि त्याच कार्यकर्त्यांच्या हातून या नेत्यांनी स्वत:चा पराभव करून घेतला.
गेली २० वर्षे अनिल देशमुख यांची काटोल मतदारसंघावर पकड होती. या मतदारसंघातील सर्व राजकीय वारे अनिलबाबू म्हणतील त्या दिशेने वाहत होते. कुणाच्या कामात काडी करायची नाही, कुणाशी वैर घ्यायचे नाही, असा त्यांचा स्वभाव. त्यामुळे मतदारसंघात सगळीकडे गोडीगुलाबीचे वातावरण राहिले. पण यामुळे पक्ष वाढला नाही. पक्षवाढीसाठी बऱ्याचदा खंबीर भूमिका घ्यावी लागते. दुसऱ्या पक्षाच्या दोन-चार कार्यकर्त्यांशी वैर घ्यावे लागते. पण अनिलबाबूत्या भानगडीत पडले नाही. एक व्यक्ती म्हणून हे त्यांनी चांगलेच केले; पण पक्षाचा नेता म्हणून त्यांची हीच कृती पक्षवाढीसाठी अडचणीची ठरली. गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रमेश बंगदेखील मतदारसंघाबाहेर फारसे पडले नाही. हिंगण्यातील कार्यकर्ता सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. पण या प्रयत्नात मतदारसंघाबाहेरील त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले. यामुळे काटोल अन् हिंगण्याबाहेरचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोरका झाल्याचे चित्र होते. घड्याळीची टीक टीक सुरू ठेवायची असेल तर यापुढे तरी जनाधार असलेल्यांना पक्षाशी जोडावे लागेल. त्यांची चार कामे करून द्यावी लागतील. नाहीतर आज हाती आलेला भोपळा पुढेही कायम राहील, यात शंका नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Who will give the keys to 'watch' off?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.