विज्ञानातून ज्ञानाकडे कोण नेणार?
By admin | Published: March 25, 2016 02:21 AM2016-03-25T02:21:17+5:302016-03-25T02:21:17+5:30
विज्ञान तंत्रज्ञानाकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ लागला आहे. देशाच्या प्रगतीत विज्ञानाचा मोठा हातभार आहे. नवनवीन शोध आणि अभ्यासामुळे देशाच्या कीर्तीतही भर पडते.
चला निवड करू या...
विज्ञान तंत्रज्ञानातील नामांकनांमुळे विज्ञानाची गोडी वाढणार
मुंबई : विज्ञान तंत्रज्ञानाकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ लागला आहे. देशाच्या प्रगतीत विज्ञानाचा मोठा हातभार आहे. नवनवीन शोध आणि अभ्यासामुळे देशाच्या कीर्तीतही भर पडते. त्यामुळेच लोकमतने विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विभाग लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कारासाठी निर्माण केला. यासाठीच्या नामांकनांमध्ये अभिषेक सेन, प्रा. दीपक फाटक, सचिन टेके, सिद्धांत पै आणि विवेक पांडे यांची निवड केली असून त्यातील एक भाग्यवंत लोकमतचे वाचक आणि ज्यूरी ठरवतील.
अभिषेक सेन, यु चेक, ठाणे
३० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘बायोसेन्स टेक्नॉलॉजी’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅनिमिया, मधुमेह, हायपर टेन्शन, मूत्रपिंडाच्या आजारांचे निदान करणारी आधुनिक वैद्यकीय उपकरणे सेन यांनी विकसित केली. ज्यात हिमोग्लोबिन मोजणारे ‘टच एचबी’, मोबाइल फोनच्या आधारे लघवी परीक्षणास मदत करणारे ‘यु चेक’, शरीरातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी ‘सू चेक’ ही यंत्रे विकसित केली आहेत. त्यांनी मुंबई आयआयटीेमधून उच्चशिक्षण घेतले. बायो मेडिकल इंजिनीअरिंग केले, तर टी.एन. हॉस्पिटलमधून त्यांनी एमबीबीएसचे (इंटर्नल मेडिसीन) शिक्षण पूर्ण केले. वॉशिंग्टन विद्यापीठाचे ते फेलो होते. बायोसेन्स कंपनीला बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे पाठबळ असलेल्या कॅनडास्थित ग्रँड चॅलेंजेसचा ‘रायझिंग स्टार्स इन हेल्थ’ हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
प्रा. दीपक फाटक
(आयटी तज्ज्ञ)
आकाश टॅबलेट, एकलव्य प्रकल्पातून शिक्षणाला नवे आयाम देणारे आणि शिक्षण क्षेत्राला क्षितिजापार नेणारा तंत्रज्ञ. तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करणारे प्रो. दीपक फाटक हे खऱ्या अर्थाने समाजाची जाण असणारे आयटी तज्ज्ञ आहेत. त्यांनी विदेशातील महागडे तंत्रज्ञान भारतीयांसाठी स्वस्तात तयार करण्यासाठी आयआयटी बॉम्बेतील विद्यार्थ्यांसह देशभरातील छोट्या-मोठ्या शाळेतील शिक्षक, खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लावली. आयटी क्षेत्रातील देदिप्यमान व्यक्तिमत्त्व़ मध्य प्रदेशातील तब्बल १४ शाळांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इंदोर येथून बी.ई. (ई.ई.), आयआयटी बॉम्बे येथून एम.ई. (ई.ई.), तर आयआयटी बॉम्बे येथून याच विषयात पीएच.डी. केली आहे. १ डिसेंबर १९७१ सालापासून प्रा. फाटक आयआयटी बॉम्बेमध्ये आयटीचे धडे देत आहेत. मात्र, आयआयटी मुंबईतील एक प्राध्यापक एवढीच त्यांची ओळख नाही, तर देशात सुरू असलेल्या माहिती-तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विषयांवरील संशोधनाला आकार देणारे तज्ज्ञ असाही त्यांचा ठसा आहे. आयआयटी बॉम्बेमधील ४१ वर्षांच्या काळात त्यांनी अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवले.
सचिन टेके, एम इंडिकेटर
घड्याळाच्या काट्यावर धावपळ करण्याची सवय मुंबईकरांना असते. या धकाधकीच्या प्रवासात सोबती बनून मार्ग दाखवण्याचे काम अॅण्ड्राइड फोनच्या युगात ‘एम इंडिकेटर’ नावाचे अॅप करत आहे. मुंबईकरांचा प्रवास सुकर करणाऱ्या या अनोख्या मोबाइल अॅपचा निर्माता सचिन टेके सध्या मुंबईकरांचा गाइड बनला आहे. सचिनने व्हीजेटीआय महाविद्यालयातून बॅचलर आॅफ इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजीची पदवी घेतली आहे. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमधून फायनान्स विषयात एमबीए केले आहे. वेळापत्रकाचे पुस्तक असले, तरी गर्दीत ते काढून वाचणे कठीण जाते. ही समस्या ओळखून मुंबईकरांच्या प्रवासाचा त्राण कमी करण्यासाठी सचिनने ‘एम इंडिकेटर’ नावाचे अॅप २०११ साली त्याच्या मोबाँड या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनींतर्गत लाँच केले.
सिद्धांत पै, (फिलामेंट
फॉर थ्रीडी प्रिंटर, पुणे)
प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कचरावेचकांकडील टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याच्या ध्यासातून सुरू झालेला प्रयोग अंतिम टप्प्यात. टाकाऊ प्लास्टिकपासून थ्री डी प्रिंटर फिलामेंट बनवण्याचा प्रयत्न चाचण्यांअंती सिद्ध झाला की, बाजारपेठ उपलब्ध करून कचरावेचकांना सक्षम करण्याचा मानस. पर्यावरणपूरक फिलामेंट बनवण्याबरोबरच फिलामेंटच्या दर्जाचे आणि आकाराचे प्रमाणीकरण करण्याचा हा प्रयोग जितका शास्त्रीय, तितकाच सामाजिक भानाचाही आहे. ग्रामीण भारतातील जनतेसाठी कमी खर्चीक एक्स-रे मशिनवर संशोधन करत होता. भ्रमंतीदरम्यान त्याचा कचरावेचक समाजाशी जवळून संबंध आला. कचरावेचकांची दैनावस्था पाहून सिद्धांत व्यथित झाला. त्यातूनच टाकाऊ प्लास्टिकपासून थ्री डी प्रिंटरसाठी लागणारे फिलामेंट मिळवता येतील, या कल्पनेचा जन्म झाला. प्लास्टिकच्या बाटल्यांवर प्रक्रिया करणारे मशिन बनवण्याचे सुरुवातीचे काही प्रयत्न अपयशी ठरले असले, तरी अखेरीस हवे तसे मशिन बनवण्यात त्यांना यश आले.
विवेक पांडे,
(इकोझेन टेक्नॉलॉजी, पुणे)
भारतात ३० टक्के वाया जाणारा नाशवंत शेतीमाल वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या कोल्ड स्टोरेजच्या तुटपुंज्या उपलब्धतेवर प्रभावी उपाय शोधण्याचे काम आयआयटी खरगपूरच्या तीन विद्यार्थ्यांनी केले आहे. देवेंद्र गुप्ता, प्रतीक सिंघल आणि विवेक पांडे या तिघांनी मिळून शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण सोलार मायक्रो कोल्ड स्टोरेज पोर्टेबल सिस्टीम विकसित केली आहे. इकोफ्रोस्ट नावाने अनेक नव्या शोधांच्या एकत्रीकरणातून मूलभूत, क्रांतिकारी उत्पादन सिद्ध. इकोफ्रोस्टने याआधीच मार्केटमध्ये या उपकरणाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. इकोफ्रोस्ट ही सौरऊर्जेवर चालणारी स्मॉल-स्केल कोल्ड स्टोरेज सिस्टीम असून, याची क्षमता पाच मेट्रिक टन आहे. याचा आकार वीस फूट बाय आठ फूट आहे. पिकांच्या गरजेनुसार याचे तापमान नियंत्रित करता येते. कमीत कमी दोन अंश सेल्सिअसपर्यंत याचे तापमान कमी करता येऊ शकते. वीजपुरवठा पुरेसा नसलेल्या ठिकाणी ही यंत्रणा खूप फायदेशीर आहे.