साहित्य क्षेत्रातील जातीय दहशतवादावर कोण बोलणार?; रा. रं. बोराडे यांचा परखड सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:35 AM2020-01-13T01:35:24+5:302020-01-13T01:35:39+5:30
मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले
प्रज्ञा केळकर-सिंग / स्नेहा मोरे
संत साहित्य गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) : वाङ्मयाच्या प्रांगणात उघडपणे आलेला जातीयवाद साहित्याचे तुकडे करणारा असून, हादेखील एक प्रकारचा दहशतवादच आहे. देशातील दहशतवादावर सगळे बोलतात, पण साहित्यातील या दहशतवादाबद्दल कोण बोलणार, असा परखड सवाल ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी उपस्थित केला. ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यवाह दादा गोरे, रामचंद्र कालुंखे, स्वागताध्यक्ष नितीन तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. तर व्यासपीठासमोर माजी मंत्री बसवराज पाटील उपस्थित होते.
आपल्या भाषणात बोराडे यांनी साहित्य क्षेत्रातील जातीयवादावर चांगलेच कोरडे ओढले. ते म्हणाले, लेखक, कलावंतांना जात नसते. परंतु तरीही पारितोषिके देताना आपल्याच जातीच्या लेखकांचा विचार होतो. गल्लीतील पारितोषिके घेऊन लेखक स्वत:ला मिरवतात. ही प्रसिद्धी म्हणजे पाण्यावरचे बुडबुडे असतात. ते कधी नष्ट होतील सांगता येत नाही. लेखक स्वत:च्या पलीकडे पाहायला तयार नाही. एक वादळ आले तर ते कोसळतील. त्यामुळे स्वत:पुरते पाहू नका. इतरांना लिहिते करा, असा सल्ला त्यांनी लेखकांना दिला.
लेखक एकमेकांची पुस्तके वाचत नाहीत, अशी खंत व्यक्त करताना बोराडे म्हणाले, वाचक कमी होत चालला आहे हे आपण आता मान्य करूया. साहित्यिकांनी एकमेकांची पुस्तके वाचली तरी मराठीचे भले होईल. चांगले लेखक व्हायचे असेल, तर आधी चांगले वाचक व्हा. मी स्वत: एकपटीने लिहिले आणि दहापटीने वाचले. तुम्ही लिहीत राहा, कोण काय म्हणते याकडे लक्ष देऊ नका आणि आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहा. कोणत्याही एका साहित्यप्रकारात अडकू नका. बालसाहित्याच्या सद्यस्थितीवरही बोराडे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सकस बालसाहित्य कमी प्रमाणात तयार होत आहे आणि ते सगळ्यांपर्यंत पोचतेच असे नाही. माझा मुलगा डॉक्टर, इंजिनिअर व्हावा, असे पालकांना वाटते. संशोधक, लेखक, चित्रकार, अभिनेता व्हावा असे पालकांना वाटत नाही. संस्कृती, देशाची ओळख कलावंतावरून केली जाते, हे विसरून चालणार नाही. नव्या पिढीला लिहितं करा, अन्यथा भविष्य वाईट असेल. आपल्या अवतीभोवती अनेक प्रतिभावान मुले, शिक्षक, नवोदित साहित्यिक आहेत, हे सांगताना प्राचार्य बोराडे यांनी नांदेडमधील दहावी वर्गातील नचिकेत मेकाले, सांगोल्याची सोनाली गावडे, सांगलीतील चौथीचा गौतमच्या गोष्टी लिहीणारा मुलगा, शिक्षक युवराज माने, शिवाजी अंबुलगेकर, प्रा. विद्या सुर्वे, अनिता यलमटे यांचा आवर्जुन उल्लेख केला.
प्रमुख कार्यवाह डॉ. दादा गोरे म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत दोन निमंत्रणे आली आहेत. यात नाशिक आणि अंमळनेर येथून आलेल्या निमंत्रणाचा समावेश आहे. धुळे आणि गोवा येथूनही निमंत्रण येण्याची शक्यता आहे.
महानगरांमध्ये संमेलने घेणे कमी करा...
महामंडळाने महानगरांमध्ये साहित्य संमेलन घेणे हळूहळू कमी करावे. जिथे खरी सांस्कृतिक भूक आहे, तेथे संमेलने भरावीत. मिरवणे हे साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट नसले पाहिजे. साहित्यिक वातावरण निर्माण करणे, हे उद्दिष्ट असले पाहिजे. ग्रामीण भागात साहित्य, नियतकालिके, प्रकाशन संस्था निर्माण होणे आवश्यक असते. परिसरात वाचक निर्माण झाला की ग्रंथालये, पुस्तकाची दुकाने निर्माण होतात, असेही बोराडे म्हणाले.
दिब्रिटो यांचे भाषण वाचून दाखविले
दिब्रिटो यांचे भाषण समारोपात वाचून दाखवण्यात आले. माहितीचा विस्फोट होत आहे. माहिती मिळवणे म्हणजे ज्ञान नव्हे. माहितीचा योग्य वापर आणि त्याचे ज्ञानात रूपांतर ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. एकविसाव्या शतकात टिकून रहायचे असेल तर धर्माधर्मात मैत्री होणे आवश्यक आहे. संतांनी आपल्याला समतेचा संदेश दिला. तोच संदेश घेऊन मी आजवरची वाटचाल केली आहे. आयोजकांनी माझ्यासारख्या शेतकºयाच्या मुलाला संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान दिला. सर्वांकडून मिळालेले प्रेम मी कधीच विसरणार नाही, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षांच्या भाषणाशी सहमत...
संमेलनाध्यक्षांचे भाषण मी ऐकले आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे. मात्र, सृजनशील लेखक राजकीय विषयांवर बोलतात, पण सृजनशील पातळीवर का येत नाहीत, त्याबद्दल का बोलत नाहीत? मराठीत किती राजकीय साहित्य उपलब्ध आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. योग्य वयात लग्न केलं पाहिजे. उशिराने लग्न करणाऱ्यांना घोड नवरा म्हणतात. त्यामुळे २००२ साली मी ठरविले की यापुढे कोणताही पुरस्कार घ्यायचा नाही. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाले की ठरविले आता संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे नाही. अर्थात मला घोड नवरा व्हायचे नाही, असे प्राचार्य बोराडे म्हणताच उपस्थितांमध्ये हंशा पिकला.
संमेलन यशस्वी : स्वागताध्यक्ष नितीन तावडे
स्वागताध्यक्ष नितीन तावडे म्हणाले, साहित्य संमेलन उस्मानाबादला व्हावे यासाठी सात आठ वर्षे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले, याचे समाधान आहे. पिंपरी चिंचवडच्या समेलनानंतर महामंडळ विदर्भात गेले. त्यामुळे मागणी काहीशी शिथिल केली. महामंडळ मराठवाड्याकडे आल्यावर मागणी पुन्हा चिवटपणे लावून धरली. निवडणुकीपूर्वी संमेलनस्थळ घोषित झाले आणि उस्मानाबादकरांनी जल्लोष केला. आचारसंहितेत संमेलन अडकले नाही, हे सुर्दैव. धावपळ, कष्ट करून हे संमेलन उभे राहिले आणि यशस्वी झाले.