सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 06:32 AM2024-05-06T06:32:08+5:302024-05-06T06:32:29+5:30
- मनोज गडनीस लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर मुंबईत आता तीन ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना (शिंदेगट ...
- मनोज गडनीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर मुंबईत आता तीन ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना (शिंदेगट वि. उद्धवसेना), हा सामना रंगणार आहे. मात्र, त्यातही मुंबई दक्षिण-मध्यमध्ये दोनदा खासदार म्हणून निवडून आलेले शिंदेसेनेचे राहुल शेवाळे आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातले अनिल देसाई यांच्यातील लढत यावेळी अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.
२०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. यंदा मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात होणारा शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार आहे. माहिम, धारावी, वडाळा, सायन-कोळीवाडा, चेंबूर, अणुशक्तीनगर या सहाही विधानसभा क्षेत्रांतील चित्रही बदलू शकते. २०१४ मध्ये मोदी लाटेत अनेकांना पराभवाचा फटका बसला होता. मात्र, २०१९ मध्ये धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, चेंबूरमधील काही भागांतील मते ही शेवाळे आणि गायकवाड यांच्यात मोठ्या प्रमाणावर विभागली गेली होती. मात्र, माहिम, चेंबूर पश्चिमेचा भाग आणि अणुशक्तीनगर येथील मध्यमवर्ग व उच्चमध्यम वर्गाची बहुतांश मते शेवाळे यांना मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला होता. मात्र, हाच मध्यमवर्ग यंदा देसाई यांच्या पारड्यात मते टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतदारसंघाचा इतिहास
१९५२ पासून १९८९ पर्यंत दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व कम्युनिस्ट पार्टीमध्येच प्रामुख्याने लढत झालेली आहे. कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे येथून १९५७ आणि १९६७ साली निवडून आले आहेत. तर १९८४ मध्ये डॉ. दत्ता सामंत येथून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर १९८९ साली शिवसेनेचे वामनराव महाडिक त्यानंतर मोहन रावले यांनी बराच काळ हा गड राखला होता. २००९ काँग्रेसतर्फे एकनाथ गायकवाड येथून २ लाख ५७ हजार मतांनी निवडून आले. मात्र, त्यावेळी शिवसेनेच्या मतांची विभागणी मनसेसोबत झाली होती व त्याचा फायदा एकनाथ गायकवाड यांना झाला होता.
राहुल शेवाळे I शिंदेगट
अविभाजीत शिवसेनेत राहुल शेवाळे हे उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले नेते होते. शिवसेनेत शाखा प्रमुख पदापासून त्यांनी कामाला सुरुवात केली. २००२ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१४ पर्यंत ते पालिकेमध्ये नगरसेवक होते. ते सलग चारवेळी मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१४ साली प्रथम ते लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि निवडून आले.
अनिल देसाई I उद्धवसेना
उद्धवसेनेचा संयत चेहरा अशी अनिल देसाई यांची ओळख आहे. पडद्यामागून संघटना बांधणी करणे, पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळणे आदी भूमिका ते पार पाडतात. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. २००२ साली ते शिवसेनेच सचिव झाले. २०१२ साली प्रथम त्यांना शिवसेनेने राज्यसभेवर पाठवले. तेव्हापासून ते राज्यसभेवर आहेत.