असा ‘मूर्खासारखा’ विचार कोण करेल बरे?
By Admin | Published: August 6, 2016 05:42 AM2016-08-06T05:42:01+5:302016-08-06T05:42:01+5:30
‘मध्यंतरी राज्य सरकारने मूर्खासारखा निर्णय घेऊन अनधिकृत बांधकामे अधिकृत केल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली,’
हेमंत कुलकर्णी,
नाशिक- ‘मध्यंतरी राज्य सरकारने मूर्खासारखा निर्णय घेऊन अनधिकृत बांधकामे अधिकृत केल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली,’ असे या राज्यातील बव्हंशी शहरांना जर्जर करून सोडलेल्या रोगाचे हुकुमी निदान राज ठाकरे यांनी नक्की केले आहे.
किती छान नाही? अत्यंत जटील, गुंतागुंतीच्या आणि बहुविध पदर असलेल्या प्रश्नांचे असे साधे सोपे आणि सरळ उत्तर कसे शोधावे, हे देशातील साऱ्याच राजकारण्यांकडून शिकण्यासारखे आहे.
राज ठाकरे नाशकात आले ते मुळात त्यांनी निवडलेल्या नाशिक शहराच्या प्रथम पौराच्या घरातील सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमास हजेरी लावण्यासाठी. आलोच आहोत तर जरा पुराच्या पाण्याने कोणे एकेकाळी गुलशनाबाद नावे ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहराचे कसे चिखलाबाद झाले आहे हे पाहाण्यासाठी त्यांनी त्यातल्या त्यात कोरड्या भागात फेरफटका मारला. अर्थात ते ‘किम कारणे’ नाशकात आले हे महत्त्वाचे नाही. मागे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हेदेखील कुण्या घरच्या मंगल कार्यासाठी आलेच होते की. तसेही ‘कामात काम भज राम राम’ अशी म्हणदेखील उपलब्ध आहेच. तेव्हां मुद्दा तो नाही.
राज ठाकरे तसे चांगल्या तालमीत तयार झालेले. चांगल्या अशा अर्थाने की मुंबई शहराचे नागरी व्यवस्थापन ज्या कुटुंबाकडे प्रदीर्घ काळापासून आहे, त्या घराण्यात आणि घरात त्यांचे बालपण सरले. त्यामुळे सरकारने जरी अनधिकृत कामांना अधिकृत करण्याचा मूर्खासारखा निर्णय घेतला असला तरी मुळात ही अनधिकृत बांधकामे उभी कोणामुळे राहिली हे त्यांच्यापरते चांगले अन्य कोण जाणू शकत असेल बरे? बांधकामाचे नकाशे तपासणे, त्यांना मंजुरी देणे, मंजुरीबरहुकूम काम केले जाते आहे वा नाही याकडे लक्ष न देणे वा साफ दुर्लक्ष करणे, नकाशात दर्शविलेल्या मजल्यांमध्ये प्रत्यक्षात केल्या गेलेल्या वा केल्या जात असलेल्या वृद्धीकडे कनवाळू नजरेने पाहाणे, हे सारे कोण करते? मंत्रालयात बसून राज्य सरकार की काय?
केवळ नाशकाचेच काय घ्यायचे. राज्यातील बहुतेक सर्व लहानमोठ्या शहरांचा कारभार पाहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बेमुर्वतखोरपणामुळे (मूर्खपणाने नव्हे हो, तो मान ठाकरे म्हणतात तसा सरकारचा!) पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपयुक्त ओढे, नाले, ओहोळ आणि लहान नद्या वा उपनद्या यांच्यात भर टाकून आणि निसर्गाने करून ठेवलेल्या अशा उपायांची गळचेपी वा मुस्कटदाबी करून जे इमले उभे राहिले आहेत आणि आजही राहात आहेत, त्यांच्यापायीच शहरांची गटारे होत आहेत.
यंदाच्या पावसासारखा पाऊस आठ वर्षांपूर्वीही आला होता. पण तेव्हां जितका हाहाकार माजला त्यापेक्षा यंदा तो कैक पटींनी अधिक माजला. या आठ वर्षांपैकी निम्म्याहून अधिक काळ राज ठाकरे यांची या गावावर सत्ता आहे. या सत्तेने आधीची किती अनधिकृत बांधकामे ध्वस्त केली आणि त्यांच्या काळात कितींनी नव्याने आपले डोके वर काढले याचा शरद पवारांच्या भाषेत एकदा निकाल घ्यावाच लागेल.
नाशिक शहराची सत्ता हाती लागल्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिककरांना अनेक स्वप्ने दाखविली. (जीन पॅन्ट-टी शर्ट घालून ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी वगैरे आठवतंय ना!) ती पूर्ण झाल्याचे त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात रेटून सांगितलेही होते. पण ‘आपण सत्तेच्या प्रारंभी जे बोललो ते यापुढे दिसायला लागेल’ असे ते आता त्यांचा येथील सत्ताकाळ जेमतेम सहा महिन्यांत संपुष्टात येत असताना म्हणू लागले आहेत. ‘एक दिवस राज्याची सत्ता हातात द्या आणि मग पाहा’ हे विधान त्यांचेच ना? (चूभूदेघे)
नाशकातील राज ठाकरे यांच्या कथित ‘ड्रीम प्रॉजेक्ट’मधील एक म्हणजे गोदा पार्क. गोदावरी नदीच्या काठाकाठाने बांधून काढायचा जॉगिंग ट्रॅक. मुंबई किंवा जिथे समुद्र आहे तिथे सीआरझेड नावाचा म्हणजे समुद्रतट नियंत्रण विभाग असा कायदा आहे आणि समुद्राच्या काठी बांधकामे करण्यावर बंदी आहे. त्या कायद्याच्या धर्तीवर आरबीआरझेड म्हणजे रिव्हर बँक रेग्युलेटरी झोन नावाचा कायदा नाही. त्यामुळे ठाकरे यांनी चक्क तिथेच हा स्वप्नाळू जॉगिंग ट्रॅक नियोजित केला. अंबानी वगैरे लोकांकडून त्यासाठी पैसेदेखील आणले म्हणतात. शहरातील जाणकरांनी तेव्हांच त्याला विरोध केला होता. पण जो विरोध करतो तो शत्रू असे बाळकडूच असल्याने राज ठाकरे यांनी आपला हेका सुरू ठेवला. परवाच्या पावसाने त्या ट्रॅकच्या आणि या हेक्याच्याही चिंधड्या उडल्या. त्यावर त्यांचे म्हणणे, पूर येणार, महापूर येणार, त्यात काय एवढे?
पत्रकारांनी स्वाभाविकच ट्रॅकचा विषय काढला तेव्हां ठाकरे म्हणाले, गोदापार्क उद्ध्वस्त झाले याचा आनंद मानू नका. आनंद कोण कशाला मानेल. नाशिककराना आनंद नाही वाटला. त्यांना कीव आली एकूणच हट्टीपणाची आणि पापावर पांघरूण घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या केविलवाण्या धडपडीची. परिणामी, शहराच्या आजच्या दुर्दशेला राज ठाकरे यांनी निवडून काढलेले कारभारी जबाबदार नाहीत असे समजण्याचा ‘मूर्खासारखा’ विचार कोण कशाला करेल बरे?