'दोषी कुणीही असो, सगळ्यांचा हिशोब व्हायलाच हवा'; बदलापूर प्रकरणावर मोदी प्रचंड संतापले
By अमित महाबळ | Published: August 25, 2024 02:31 PM2024-08-25T14:31:16+5:302024-08-25T14:34:26+5:30
PM Modi On Violence against Women: जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लखपती दीदी कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर आरोपींना मदत करणाऱ्यांनाही पंतप्रधानांनी इशारा दिला.
PM Modi In Jalgaon: कोलकाता, बदलापूरमधील बलात्काराच्या घटनेने महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. महिलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. जळगाव येथील सभेत बोलताना मोदींनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना कडक इशारा दिला. (pm modi first reaction on badlapur sexual abuse case)
जळगाव येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "महिलांचे सामर्थ्य वाढवण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेलाही देशाचा प्राधान्यक्रम आहे. मी लालकिल्ल्यावरूनही सातत्याने हा विषय मांडला आहे. आपल्या महिला आणि मुलींच्या वेदना, त्यांचा राग मला समजत आहे."
आरोपींना मदत करणाऱ्यांना मोदींनी दिला इशारा
"मी पुन्हा एकदा देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला आणि राज्य सरकारांना आवाहन करतो की, महिलांवरील हिंसा अक्षम्य पाप आहे. दोषी कुणीही असो, तो सुटता कामा नये. त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणारे सुटता कामा नये", असा इशारा मोदींनी दिला.
"रुग्णालये असो, शाळा असो, कार्यालये असो वा पोलीस प्रशासन, ज्या पातळीवर कामचुकारपणा होईल, त्या सगळ्यांचा हिशोब व्हायला हवा", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
"वरपासून खालपर्यंत स्पष्ट मेसेज जायला पाहिजे. हे खूप अक्षम्य आहे. सरकार येतील आणि जातील. पण, जीवनाची आणि महिलेच्या सन्मानाचे रक्षण, हे समाज आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे", असे आवाहन मोदी यांनी केले.
आरोपींना शिक्षा होण्यासाठी कडक कायदे केले -मोदी
"महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आमचे सरकार सातत्याने कठोर कायदे करत आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली आल्या आहेत. पूर्वी तक्रारी येत होती की, वेळेत एफआयआर, सुनावणी होत नाही. विलंब होतो. अशा अडचणी आम्ही भारतीय न्याय संहितेतून दूर केल्या आहेत", असे मोदी यांनी यावेळी सांगितले.