...अन् सभागृहात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘त्याला’ भररस्त्यात फाशी दिली पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:53 PM2023-07-27T12:53:03+5:302023-07-27T12:53:46+5:30
सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यावरून सभागृहात गोंधळ झाला.
मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानसभेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्याविरोधात संतप्त भूमिका सरकार आणि विरोधकांनी व्यक्त केल्या. सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणले पाहिजे असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले तर तुम्ही मुसक्या बांधण्याचे बोलता पण आमचे मत आहे भररस्त्यात त्याला फाशी दिली पाहिजे असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमच्या आणि माझ्या भावना कितीही तीव्र असल्या तरी आपल्याला कायद्याचे पालन केले पाहिजे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या वेबसाईटने हे शेअर केले त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. सावित्रीबाईंविरोधात लिखाण करण्याचा सरकारमार्फत निषेध करतो. भारद्वाज स्पिक हे ट्विटर हँडल आहे. त्याबाबत ट्विटर इंडियालाही पत्र पाठवले आहे. पोलीस त्यांच्या संपर्कात आहेत. कुठल्याही परिस्थितीत या व्यक्तीला अटक केली जाईल. अलीकडच्या काळात जे डिजिटल पेपर आहेत. त्यात हे प्रसिद्ध झालेत. त्यांनाही नोटीस दिली आहे. काहीही झाले तरी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि कुठल्याही महापुरुषाविरोधात लिखाण होत असेल तर त्यांना पाठिशी घातलं जाणार नाही असं त्यांनी सभागृहात म्हटलं.
विरोधकांनी घातला गोंधळ
या प्रकरणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर निशाणा साधला. थोरात म्हणाले की, या प्रकरणी सरकारची भूमिका संशयास्पद आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती अत्यंत चुकीचे लिखाण करणारा अजूनही मोकाट आहे. सरकारने असे विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराला मुसक्या बांधून आणले पाहिजे आणि रस्त्यावरून फिरवले पाहिजे, सरकार हे कधी करणार आहे? असा संतापजनक सवाल त्यांनी केला.
मात्र या प्रकरणी सभागृहात गोंधळ झाला. सरकारच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधी पक्षाने सरकारविरोधात घोषणा दिल्या. या गोंधळानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.‘सत्य बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी आपण दोन वर्षांची शिक्षा करतात आणि दुसरीकडे विकृत गुन्हेगार मोकाट फिरतात. हा कसला न्याय? असा सवालही थोरात यांनी सरकारला केला. तर सभागृहातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या मुद्द्यावरून सभात्याग केला. खरेतर अशा मुद्द्यावर राजकारण करू नये. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत पक्ष-विरोधी पक्ष असू शकत नाही. हे सभागृह एक आहे. मात्र मतांच्या राजकारणासाठी हे केले जात असेल तर त्याचा निषेध आहे असं फडणवीसांनी थोरातांना सुनावले.