अख्खे कुटुंबच रिंगणात!
By admin | Published: February 10, 2017 01:38 AM2017-02-10T01:38:56+5:302017-02-10T01:38:56+5:30
महापालिका प्रभाग १७ मध्ये राजू लोखंडे, त्यांच्या पत्नी, वहिनी, पुतण्या, भाचा असे अख्खे लोखंडे कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
मंगेश व्यवहारे, नागपूर
महापालिका प्रभाग १७ मध्ये राजू लोखंडे, त्यांच्या पत्नी, वहिनी, पुतण्या, भाचा असे अख्खे लोखंडे कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
अनुसूचित जाती गटातून भारिप बहुजन महासंघाकडून राजू लोखंडे यांच्या विरोधात त्यांचा भाचा प्रशांत ढाकणे हे काँग्रेसकडून उभे आहेत. सर्वसाधारण महिला गटातून राजू लोखंडे यांच्या पत्नी मीनाक्षी लोखंडे तर पुतण्या आकाश लोखंडे हे सर्वसाधारण गटातून भारिप बहुजन महासंघाकडून उभे आहेत. विशेष म्हणजे, राजू लोखंडे यांचे मोठे बंधू रमेश लोखंडे यांच्या पत्नी सत्यभामा लोखंडे या प्रभाग ३३ सर्वसाधारण महिला गटातून बहुजन समाज पार्टीकडून रिंगणात आहे. महापालिकेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील पाच जण उभे असल्याची कदाचित ही पहिलीच घटना घटना म्हणावी लागेल.
प्रभाग क्र. २५ मध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेविका कुमुदिनी कैकाडे यांच्याऐवजी त्यांचे पती श्रीकांत यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार होती. परंतु पक्षाने कैकाडे कुटुंबाची दखल न घेतल्याने, एकाच प्रभागातून पती-पत्नीने अपक्ष म्हणून दंड थोपटले आहे. शिवसेनेचे नगरसेवक बंडू तळवेकर हे प्रभाग ४ मधून रिंगणात आहेत. प्रभागात केलेल्या आपल्या कामाचा फायदा आपल्या घरातच झाला, तर काय वाईट, या उद्देशातून त्यांनी पत्नी सुरेखालाही अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले आहे. उत्तर नागपुरातील बसपाच्या नगरसेविका हर्षला जयस्वाल या प्रभाग ६ मधून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर त्यांचे पती संजय जयस्वाल हे प्रभाग ७ मधून रिंगणात आहेत. पती-पत्नीबरोबरच मायलेकसुद्धा रिंगणात आहे. काँग्रेसचे उमेदवार कमलेश चौधरी यांना काँग्रेसने प्रभाग १४ मधून उमेदवारी दिली आहे, तर त्यांची आई मीना चौधरी या प्रभाग १२ मधून अपक्ष म्हणून लढत आहे. मायलेकाबरोबर बहीण-भावालाही सत्ता हवी आहे, त्यामुळे भाजपाचे प्रवीण भिसीकर व त्यांची बहीण यशश्री नंदनवार हे दोघेही प्रभाग ५ आणि २० मधून रिंगणात आहेत. नणंद-भावजयीचे वैर सर्वश्रुतच आहे. महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ३६ मध्ये याची प्रचिती येते. माजी नगरसेविका पल्लवी श्यामकुळे यांच्याविरुद्ध त्यांच्या भावाच्या पत्नी प्रज्ञा पन्नासे उभ्या ठाकल्या आहे. नात्यांमध्ये रंगलेल्या दंगलीबद्दल उत्सुकता आहे.