द होल थिंग इज दॅट के भैया, सबसे बडी है सत्ता..!
By admin | Published: March 5, 2017 12:55 AM2017-03-05T00:55:37+5:302017-03-05T00:55:37+5:30
मुंबई महापालिकेत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला पाहिजे म्हणजे शिवसेना चिडेल आणि सत्तेतून बाहेर पडेल, अशी व्यूहरचना राष्ट्रवादीने आखली, काँग्रेसने स्वत:चा महापौर
- अतुल कुलकर्णी, मुंबई
मुंबई महापालिकेत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला पाहिजे म्हणजे शिवसेना चिडेल आणि सत्तेतून बाहेर पडेल, अशी व्यूहरचना राष्ट्रवादीने आखली, काँग्रेसने स्वत:चा महापौर पदाचा उमेदवार जाहीर करत या निवडणुकीत आपण कोणासोबतही नाही हे दाखवून दिले तर मनसेने आपले पत्ते अजूनही गुलदस्त्यात ठेवले आहेत, या सगळ्यांचे पडसाद राज्याच्या सत्तेवर पडू शकतात हे लक्षात येताच शेवटच्या क्षणी भाजपाने महापौरपदाच्या निवडणुकीतूनच माघार घेतली. सकृतदर्शनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मास्टर स्ट्रोक वाटत असला तरी राजकीय परिस्थितीचे अचूक भान राखत त्यांनी लांब उडी मारण्यासाठी चार पावले मागे जाण्याची यशस्वी खेळी खेळली आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०० टक्के युतीचाच महापौर होणार, असे केलेले विधानही त्यामुळे हवेत विरुन गेले आहे. मात्र ज्या पारदर्शतेचा मुद्दा फडणवीस यांनी मांडला तीच पाददर्शकता आणण्यासाठी उपराजधानीत; नागपुरात आणि नव्याने सत्ता मिळालेल्या पुण्यासह अन्य महापालिकांमध्येही उपलोकायुक्त नेमणार का?, असा सवाल आता शिवसेना उपस्थित करु शकते.
गुरुवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चार तास मिटिंग घेतली. शनिवारीही मुंबईसह अन्य ठिकाणच्या राजकीय हालचालींचा आढावा घेण्यासाठी दुपारीपर्यंत त्यांची बैठक झाली. त्यात कोणत्याही स्थितीत शिवसेनेचा महापौर पडला पाहिजे त्यासाठीची व्यूहरचना आखली गेली. शिवाय पारदर्शकतेची भूमिका मांडत असताना कुख्यात डॉन अरुण गवळी मध्यस्थी करतो आणि त्याची मुलगी गीता गवळी मुख्यमंत्र्यांना वर्षावर जाऊन भेटते, हे कोणत्या नैतिकतेत बसते? याची जाहीर चर्चा घडवून आणण्याचेही दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या रात्रीच्या बैठकीत ठरले.
उत्तर प्रदेशात जसे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले गेले तसाच निर्णय राज्यात घ्या असे सांगत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनी बिलाच्या वेळी विरोध करुन सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची खेळी शिवसेनेकडून खेळली जाण्याची तयारी चालू होती. शिवसेनेने राज्यात सरकार बनवावे, राष्ट्रवादी त्यांना बाहेरुन पाठिंबा देईल, त्यानंतर काय मोडतोड करायची ती करु, अशा हालचालींनीही वेग घेतला होता. या सगळ्या पार्श्वभूमीचे मूळ मुंबई महापालिकेच्या महापौर पदात होते. त्यामुळे राज्याचे सरकार अस्थिर करण्यापेक्षा आपण स्वत:हून बाहेर राहण्याचा सावध पवित्रा भाजपाने घेतला आहे.
विरोधकांची ‘स्पेस’ही खेचून घेतली
- मुंबई महापालिकेच्या कारभारात २० वर्षे भाजपाबरोबरीची भागीदार होती. त्यामुळे एकट्या शिवसेनेने भ्रष्टाचार केला आणि भाजपा त्यापासून दूर कशी राहू शकते?, असे सवाल निवडणुकीच्या काळात विचारले गेले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बाजूला राहायचे, आणि शिवसेनेने जसे राज्याच्या सत्तेत राहून विरोधकांची स्पेसही स्वत:कडे खेचून घेतली त्याच नितीने मुंबई महापालिकेत राहून भाजपा आता विरोधकांची स्पेस स्वत:कडे खेचून घेईल.
- ‘तुम्ही राज्यातल्या कारभारावर काही बोललात की आम्ही महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढू’ असा हा सरळ सरळ सामना आता रंगणार आहे. गेल्या काही वर्षात भाजपाच्या अनेक मंत्र्यांच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा शिवसेना त्यात तेल ओतण्याचे काम हिरीरीने करत होती.
- आता काही काळ विश्रांती घेऊन शांतपणे डावपेच आखत राजकीय मैदान मारण्याची ही मोठी खेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खेळली आहे. हा सामना सकृतदर्शनी जरी फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे असा दिसत असला तरी तो फडणवीस विरुद्ध शरद पवार असाही रंगल्यास नवल नाही.
- कुख्यात डॉन अरुण गवळी मध्यस्थी करतो आणि त्याची मुलगी गीता गवळी मुख्यमंत्र्यांना वर्षावर जाऊन भेटते, हे कोणत्या नैतिकतेत बसते? याची जाहीर चर्चा घडवून आणण्याचेही दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या रात्रीच्या बैठकीत ठरले.
- मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयामुळे अनेक फायदे होणार आहेत. २५ वर्षे युतीत सडली, आता युती नाही, अशी गर्जना करीत भाजपा सरकारला शिवसेनेने दिलेला नोटीस पीरियड संपणार आहे आणि शिवसेना सत्तेशिवाय राहू शकत नाही हे वास्तवही अधोरेखित होणार आहे.