वृद्धाने केले संपूर्ण गाव व्यसनमुक्त!
By admin | Published: June 13, 2015 01:56 AM2015-06-13T01:56:43+5:302015-06-13T01:56:43+5:30
व्यसनापायी संपूर्ण गावाचीच राखरांगोळी होताना पाहून खिन्न झालेल्या वृद्धाने पुढाकार घेऊन गावातील तरूणांच्या सहकार्याने संपूर्ण गावच व्यसनमुक्त करून वेगळा
प्रताप नलावडे, बीड
व्यसनापायी संपूर्ण गावाचीच राखरांगोळी होताना पाहून खिन्न झालेल्या वृद्धाने पुढाकार घेऊन गावातील तरूणांच्या सहकार्याने संपूर्ण गावच व्यसनमुक्त करून वेगळा आदर्श घालून दिला आहे. व्यसनमुक्तीसाठी गावातील प्रत्येकाला शपथ देतानाच कोणी व्यसन केले तर त्याला मोठा दंड आकारण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. १२ दिवसांपासून या गावात दारू, विडी, सिगारेट, तंबाखू आणि गुटखा विक्री बंद करण्यात आली आहे.
बीड जिल्'ातील शिरूर कासार तालुक्यातील बरगवाडी हे अडीच हजार लोकसंख्येचे डोंगरकुशीतील गाव. गावातील ९० टक्के लोक ऊस तोडणी कामगार आणि मोलमजुरी करणारे. गावातील ७० ते ८० टक्के लोक दारू , तंबाखू, आणि गुटख्याच्या आहारी गेलेली. गावात सतत भांडणे, मारामारी आणि कटकटी. व्यसनाने इतका विळखा घातलेला की सकाळपासूनच अनेकजण दारूच्या नशेत झिंगलेले असायचे. गावात एखादे लग्न दुपारी १२ च्या मुहुर्तावर असले तर ते लग्न सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान लागायचे.
व्यसनामुळे गावाची होणारी दुर्दशा पाहून सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गुरसाळे यांनी पुढाकार घेतला आणि गावातील संभाजी जाधवल दीपक मुळीक, अशोक मुळीक, संतोष बर्ग, सोनाजी तुपे आणि उपसरपंच अंकुश यादव यांच्याशी गावालाच व्यसनमुक्त करण्यासंदर्भात चर्चा सुरू केली. यासाठी संभाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात व्यसनमुक्तीवर एक व्याख्यान ठेवण्यात आले. सगळा गाव यासाठी जमा झाला होता. महिलांचीही उपस्थिती होती. दुसऱ्या दिवशी महिलांनी गुरसाळे यांना गावात व्यसनमुक्ती झाली पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी करण्याचा आग्रह धरला. गावात बैठका सुरू झाल्या. सुरूवातीला फारसे लोक येत नसत. परंतु हळूहळू लोक जमू लागले आणि ३१ मे चा मुहुर्त गाठून संपूर्ण गावाने व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचा निर्णय झाला. गुरसाळे यांनी प्रत्येकाला व्यसनमुक्तीची शपथ दिली. अगदी मुलाच्या वयाच्या तरूणाचेही गुरसाळे पाय धरताना पाहून अनेकजण खजिल झाले.
याचवेळी गावात दारू विक्री करणाऱ्या चौघांनी गुरसाळे यांचे पाय धरले आणि यापुढे गावात आम्ही दारू, गुटखा, तंबाखू असे काहीच विकणार नाही. तसे आढळून आले तर आम्हाला दंड करा, असा प्रस्ताव ठेवला. गावात अशी विक्री करणाऱ्यासाठी पन्नास हजार रूपये दंड तर व्यसन करणाऱ्याला पाच हजार रूपये दंडाची रक्कम गावकऱ्यांनी निश्चित केली. या सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समितीही तयार करण्यात आली.