महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 09:15 PM2023-05-07T21:15:03+5:302023-05-07T21:16:14+5:30
Sharad Pawar News: शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री आमचचा होणार, असा दावा केला आहे.
Sharad Pawar News: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदावे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील काही ठिकाणी बॅनर लागल्याचे पाहायला मिळाले. यातच अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छाही बोलून दाखवली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीची सत्ता आली तर आता पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, यावर भूमिका स्पष्ट केली.
पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. तर महाविकास आघाडीत ज्या पक्षाच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले होते. कुठल्याही कारणामुळे महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे सूचक विधानही नाना पटोले यांनी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल, असे विधान केले होते. यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच शरद पवार यांनीही यावर भाष्य करताना भूमिका स्पष्ट केली.
...तोपर्यंत मत मांडायला काही हरकत नाही
नाना पटोले यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, साधारणपणे तसेच असते. ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. यात फारसे काही चुकीचे नाही. परंतु आमची याबाबत अशी काही चर्चा झालेली नाही. ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीचा याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत हे मत मांडायला काही हरकत नाही, असे शरद पवार म्हणाले. तसेच जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना, जयंत पाटील यांनी कोणत्या समीकरणांच्या आधारावर हे वक्तव्य केले हे मला माहिती नाही. ज्यांच्या आमदारांची संख्या जास्त असते, त्यांचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे सध्या यावर चर्चा करायची नाही, असे शरद पवार म्हणाले.