चांगले दिवस नक्की कोणास? उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
By admin | Published: January 5, 2015 08:58 AM2015-01-05T08:58:05+5:302015-01-05T11:11:57+5:30
काँग्रेसच्या राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्यास आले असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - शुक्रवारी रेल्वे यंत्रणा कोलमडल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होऊन जो गोंधळ झाला त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्यास आले असा प्रश्न 'सामना'तील अग्रलेखातून विचारला आहे.
शुक्रवारी मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे दिवा-मुंब्रा स्थानकातील संतप्त प्रवासी रुळांवर उतरल्याने एकच गोंधळ माजला, जवळजवळ दंगलच सुरू झाली. अनेकांनी तोडफोड केली, मोटरमन्सनाही मारहाणीचा फटका बसला. या सर्व प्रकाराबाबत अग्रलेखात नाराजी नोंदवण्यात आली आहे. मात्र ही हिंसक परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत कोण असा प्रश्नही लेखात विचारण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे अनेकांचे रोजगार, शाळा, कॉलेज, परीक्षा बुडाल्या, यासाठी रेल्वेचे प्रशासन जबाबदार आहे. मोबाईलवरून एस.एम.एस.द्वारा तिकीट मिळेल अशी योजना रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली, पण तिकीट घेऊनही फलाटावरून गाडी सुटणार नसेल तर लोकांच्या मनातील संतापाचा स्फोट हा होणारच, अशी टीकाही करण्यात आली आहे.
कॉंग्रेस राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस कोणाच्या वाट्यास आले हा प्रश्नच आहे. दुसर्यांचे सरकार असते तेव्हा लोकांनी कायदा हातात घ्यावा असे ज्यांना वाटत होते त्यांचे सरकार देशात व राज्यात अवतरले आहे. काँग्रेस राजवटीत उडालेला भडका हा जर लोकभावनेचा उद्रेक होता तर मग आता तोच उद्रेक कायदा सुव्यवस्थेची होळी वगैरे ठरू नये असे सांगत असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार काय करणार आहे तेवढे सांगावे, असा प्रश्नही लेखात विचारण्यात आला आहे.