'जिनके घर शिशे के होते है...वो दुसरो के ऊपर पथ्थर नही मारते' - मुख्यमंत्री
By Admin | Published: July 20, 2016 07:27 PM2016-07-20T19:27:02+5:302016-07-20T19:27:02+5:30
भाजप हा गुंडांचा पक्ष हे कोण म्हणतंय, राणेंनी सिंधुदुर्गातील गुन्ह्याची आकडेवारी पाहावी. सिंधुदुर्गात कुणावर किती गुन्हे हे सांगितलं तर राणेंची पंचाईत होईल
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० : भाजप हा गुंडांचा पक्ष हे कोण म्हणतंय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंची खिल्ली उडवली. राणेंनी सिंधुदुर्गातील गुन्ह्याची आकडेवारी पाहावी. सिंधुदुर्गात कुणावर किती गुन्हे हे सांगितलं तर राणेंची पंचाईत होईल. राणेंनी केलेल्या प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्र्यांनी आज सडेतोड उत्तरं दिली. गृहमंत्रीपदाचा राजीनामा मागणाऱ्या राणेंना उत्तर देताना 'जिनके घर शिशे के होते है...वो दुसरो के ऊपर पथ्थर नही मारते' असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी प्रतिहल्ला केला.
कोपर्डी बलात्कारप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्तउतर दिले. माझ्या कामाचं मूल्यमापन जनता करेल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी टोला हाणला.
राज्याच्या एका मंत्र्यानं महिला अधिका-यावर अत्याचार केले, असा खळबळजनक आरोप नारायण राणेंनी काल विधानपरिषदेत केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिले. असा कुणीही मंत्री असेल तर त्याला ताबडतोब बाहेर काढीन, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितल.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंवरही टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले विरोधी पक्षनेत्यांनी जबाबदारीने आरोप करणे आवश्यक होतं. कायद्याचं ज्ञान मलाही आहे. कॅबिनेट मंत्री राम शिंदेंसोबत आरोपीचा फोटो असल्याचा कांगावा विरोधी पक्षनेत्यांनी केला. मात्र त्यापूर्वी त्यांनी थोडीशी खातरजमा करणं आवश्यक होतं.