खरी शिवसेना कुणाची? उबाठा अदृश्य पक्ष असल्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 09:54 AM2023-08-05T09:54:22+5:302023-08-05T09:54:52+5:30
सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग, शेलार मोठे नाहीत असा प्रतिहल्ला ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी चढविला.
मुंबई : या सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) असा कोणताही पक्ष नाही. केवळ एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आहे. निवडणूक आयोगाचीही त्यांनाच मान्यता आहे. शिवसेना उबाठा हा तर अदृश्य पक्ष आहे असा हल्लाबोल भाजपचे आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला याचा संबंध इथे नाही. सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले आहे, मुख्य प्रतोद सुनील प्रभू आहेत. भरत गोगावले नाहीत. सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग, शेलार मोठे नाहीत असा प्रतिहल्ला ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी चढविला.
महाराष्ट्र माथाडी, हमाल, व इतर श्रमजीवी कामगार आणि खासगी सुरक्षा रक्षक सुधारणा विधेयक २०२३ दोन्ही सभागृहाच्या २१ जणांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव होता. या समितीमध्ये उबाठा शिवसेनेला प्रतिनिधित्व दिले नाही असा आक्षेप जाधव यांनी घेतला. विधिमंडळाच्या समित्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचे किती सदस्य, विरोधी पक्षाचे किती सदस्य घ्यावेत, याबाबत निश्चित असे नियम असतात याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.