बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव?; SIT चौकशी करा, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 10:46 AM2022-12-25T10:46:47+5:302022-12-25T10:47:10+5:30
अधिवेशनात काहीही गाजत नाही. केवळ चिखलफेक केली जात आहे. भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे असं राऊतांनी म्हटलं.
मुंबई - दिशा सालियान मृत्यूप्रकरणी राज्य सरकारनं SIT स्थापन केल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानांवर SIT स्थापन करा. महापुरुषांवरील वादग्रस्त विधानांची जी मालिका सुरू केली. तरी ते राज्यपालपदावर आहेत. SIT यावर स्थापन व्हायला पाहिजे. SIT बिल्डर सुरज परमारच्या डायरीवर स्थापन व्हायला पाहिजे अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, अधिवेशनात काहीही गाजत नाही. केवळ चिखलफेक केली जात आहे. भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. कुठलेही सरकार इतक्या सूडबुद्धीने वागले नाही. या प्रकरणात भाजपाला जे हवे तेच घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा मागे पडला. मंत्र्यांविरोधात SIT स्थापन करा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असं त्यांनी सांगितले.
तसेच खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत एक विषय मांडला. ठाण्यातील बिल्डर सुरज परमार आत्महत्येप्रकरणानंतर तपासात जी डायरी सापडली त्यात जी काही सांकेतिक नावं आहे. ती कुणाची आहेत? आम्हाला माहिती आहे. त्यावर SIT लावा. सगळ्यात आधी राज्यपालांनी छत्रपतींचा अपमान केलाय त्याची चौकशी करा. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. हे सरकार खोके गोळा करण्यासाठी आलेत. जनतेच्या प्रश्नावर सरकार स्थापन झालं नाही. शिवसेना फोडायची, संपवायची, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान नष्ट करायचा यासाठी हे सरकार आलंय असं संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, अनेक विषय आहेत. विरोधी पक्षांवर SIT स्थापन केली जाते. दिशा सालियानच्या आई वडिलांना माध्यमांसमोर बोलू दिलं जात नाही. ही दडपशाही आहे. त्यांच्यामागे ईडी, सीबीआयही लावतील. तिच्या आई वडिलांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे-फडणवीस यांचे हायकमांड दिल्लीला आहे. त्यांना वारंवार तिथे जावं लागते असा टोलाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.