मतदारांचा निरुत्साह कोणाच्या पथ्यावर?

By admin | Published: April 13, 2015 05:56 AM2015-04-13T05:56:45+5:302015-04-13T05:56:45+5:30

वांद्रे (पूर्व) येथील विधानसभा पोटनिवडणुकीत जेमतेम ३८ टक्के मतदान झाले असून, मतदारांनी या निवडणुकीकडे चक्क पाठ फिरवली आहे. या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळा

On whose path is the lack of voters? | मतदारांचा निरुत्साह कोणाच्या पथ्यावर?

मतदारांचा निरुत्साह कोणाच्या पथ्यावर?

Next

संदीप प्रधान, मुंबई
वांद्रे (पूर्व) येथील विधानसभा पोटनिवडणुकीत जेमतेम ३८ टक्के मतदान झाले असून, मतदारांनी या निवडणुकीकडे चक्क पाठ फिरवली आहे. या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असताना येथील सहानुभूतीची लाट कुठे लुप्त झाली, असा प्रश्न मतदानाच्या कमी टक्केवारीमुळे उपस्थित झाला आहे. तर एमआयएमच्या ओवेसी बंधूंच्या विखारी प्रचारामुळे मतदाराने मतदानाकडे पाठ फिरवली की काय, हाही सवाल केला जात आहे. हे अत्यल्प मतदान शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्या पथ्यावर पडणार की काँग्रेसचे नारायण राणे हे सावंत यांच्या नाकी नऊ आणणार याचे कुतूहल यामुळे वाढले आहे.
वांद्रे (पूर्व) मतदारसंघात ४२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मतदानाची अंतिम आकडेवारी आल्यावर सर्वसाधारणपणे मतांची टक्केवारी काही अंशी वाढते. मात्र येथे मतांची टक्केवारी चक्क ४ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे शिवसेना व एमआयएम या दोन्ही पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. या मतदारसंघात शनिवारी दुपारपर्यंत मतदार स्वत:हून मतदानाकरिता बाहेर पडले नाहीत. त्यामुळे दुपारनंतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना प्रयत्नपूर्वक घराबाहेर काढले. बाळा सावंत यांच्या लोकप्रियतेवर व जनसंपर्कावर आतापर्यंत शिवसेना या मतदारसंघात विजयी होत आली. परंतु मातोश्रीच्या अंगणातील या मतदारसंघात संघटनात्मकदृष्ट्या शिवसेना कमकुवत होती. त्यातच तृप्ती सावंत यांच्या उमेदवारीला शिवसेनेतून विरोध होता. तृप्ती सावंत यांच्या पाठीशी सहानुभूती उभी राहते का, हे पाहणे त्यामुळे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: On whose path is the lack of voters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.