ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 05:35 AM2024-11-20T05:35:46+5:302024-11-20T05:37:02+5:30
निम्म्याहून अधिक पोलिसांचे अर्ज यादी, भाग क्रमांक चुकीचा टाकणे किंवा इतर कारणांनी मतदान बाद ठरले.
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
Maharashtra Election 2024: ज्यांच्या बळावर लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे, त्याच पोलिसांनामतदानाचा हक्क गमवावा लागल्याचे समोर आले आहे. राज्यभरासह नवी मुंबई पोलिसांकडून त्याबाबत खंत व्यक्त होत आहे. यावेळी पहिल्यांदाच ऑनलाइन झालेल्या प्रक्रियेतील त्रुटींचा फटका पोलिसांना बसला आहे. मात्र, यावर कोणीही उघडपणे बोलायला तयार नाहीत.
बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना, बहुतांश पोलिसांना मात्र मतदानाचा हक्क बजावता आला नाही. नवी मुंबई पोलिस दलातील सुमारे साडेचार हजार पोलिसांपैकी सुमारे दोन हजार पोलिसांवर ही नामुष्की आली आहे.
दरवेळी पोलिसांचे पोस्टल मतदान घेतले जाते. मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत ही प्रक्रिया पोस्टामार्फत राबवली जात होती. परंतु यंदा प्रथमच मतदानाची प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात आली. त्यासाठी पोर्टलवर पोलिसांची माहिती भरण्यात आली होती. परंतु पोर्टल डाउन होण्यासह इतर अनेक कारणांनी सुमारे ८० टक्के पोलिसांचीच माहिती भरली गेली.
त्यातही निम्म्याहून अधिक पोलिसांचे अर्ज यादी, भाग क्रमांक चुकीचा टाकणे किंवा इतर कारणांनी मतदान बाद ठरले. यामुळे त्यांचे बॅलेट प्राप्त झाले नाही, तर काहींनी अनेक प्रयत्नानंतर हक्क बजावता आला.
मतदान टक्का घसरत असल्याची खंत
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातून सुमारे साडेसहाशे पोलिस इतर शहरात बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत, तर उर्वरित पोलिस शहरातच वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळपासून कर्तव्यावर हजर झाले आहेत. या सर्वांना मतदानापासून वंचित ठेवणाऱ्या निवडणूक विभागाच्या यंत्रणेवर त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यातही शासन प्रयत्न करत असतानाच अशा त्रुटींमधून मतदानाचा टक्का घसरत असल्याचीही खंत व्यक्त होत आहे.
ऑनलाइन पोर्टलचा राज्यभरात फटका
- बॅलेट मिळवण्यासाठी पोलिसांकडून मागील १५ दिवसांपासून ऑनलाइन माहिती भरून घेतली जात होती. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी माहिती असलेल्या यादी, भाग क्रमांक अर्जात भरले होते.
- परंतु शेवटच्या क्षणी निवडणूक विभागाकडून होणाऱ्या याद्यांमधील बदलांमुळे सर्वांचेच सिरीयल नंबर, यादी नंबर, भाग नंबर यात बदल झाल्याने त्यांचे अर्ज बाद ठरले आहेत.
- याचा फटका नवी मुंबई तसेच राज्यभरातील पोलिसांच्या बॅलेट मतदानावर झाल्याचे दिसून येत आहे.