Diwali2017 Calendar : दिवाळी साजरी करण्यामागची कारणं आणि प्रतिकं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 04:24 PM2017-10-18T16:24:16+5:302017-10-18T18:20:44+5:30
भारतात दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी होत असली तरीही त्याचं स्वरुप वेगवेगळं असतं. प्रत्येकाचा त्यामागचा हेतू वेगळा असतो.
सर्वप्रथम सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा, असं म्हणत आपण कधीच दिवाळीच्या तयारीला लागलो होतो. मात्र आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आपण दिवाळी का साजरी करतो हे माहीत नसतं. आजच्या या लेखात आपण वरवरचा आढावा घेऊया की दिवाळी का साजरी केली जाते आणि त्यातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय असतं.
वसुबारस
वसुबारस या दिवसाने दिवाळीची सुरुवात होते. काही ठिकाणी पहिल्या दोन दिवसांना लहान दिवाळी असेही म्हटले जाते. यादिवशी गाय आणि वासराची पुजा केली जाते. गायीचं दुध भारतीय शेतकरी कुटूंबांसाठी उदरनिर्वाहाचा एक पर्याय आहे. त्यामुळे गायीला आई मानून तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते.
धनत्रयोदशी
यादिवशी वैद्य आपल्या साधनांची तर व्यापारी लोकं आपल्या चोपड्यांची पूजा करतात. वेगवेगळ्या व्यवसायातील लोकं शस्त्रपूजा तसंच धनपूजा अर्थात लक्ष्मीपूजा करतात. घरात, व्यापारात आणि व्यवसायात नेहमी भरभराट होवो, संपन्नता राहो म्हणून धन्वंतरी देवीची पूजा केली जाते. एक शुभ मुहूर्त मानून लोकं काही नवीन वस्तु अथवा वास्तुंमध्ये पैश्याची गुंतवणुक करतात किंवा खरेदी करतात.
नरकचतुर्दशी
बऱ्याच ठिकाणी आजच्या दिवसाला दिवाळीची खरी सुरुवात समजतात. तर काही ठिकाणी याला मोठी दिवाळी असंही म्हणतात. यादिवशी श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध करुन इतरांना त्याच्या भयाण त्रासात मुक्त केल्याची कथा आहे. त्या मुक्तीच्या आनंदात हा दिवस साजरा केला जातो. चांगल्याचा वाईटावर विजय या प्रतिकासाठी हा दिवस साजरा होतो.
लक्ष्मीपूजन
या दिवसाला एक फार शुभ दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मीची पुजा केली जाते. घरातील सोनं, पैसे किंवा महागड्या किंमती वस्तु देवासमोर मांडून त्याची पुजा केली जाते. या वैभवासाठी देवाचे आभार मानले जातात. लक्ष्मीने प्रसन्न व्हावे आणि कायम आपल्याकडे वास करावा यासाठी तिची आराधना केली जाते.
बलिप्रतिपदा
बलीप्रतिपदा हा दिवस साजरा करण्यामागेही एक आख्यायिका आहे. बली नावाचा अतिशय श्रीमंत आणि धनवान राजा होता. त्याला त्याच्या संपत्तीचा गर्व झाला होता. आपल्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही असा त्याचा समज झाला होता. त्याचा हा गर्व कमी करण्यासाठी श्रीकृष्ण वामनाचं रुप घेऊन त्याच्याकडे पोहोचला. पाहुण्याच्या पाहुणचारात कोणतीही उणीव राहू नये, याची बलीने दक्षता घेतली. मात्र वामनला हे काहीच नको होते. त्याने फक्त तीन पाऊले जागेची मागणी केली. तेव्हा बलीला ती गंमत वाटली, त्याने ती मागणी हसत हसत मान्य केली. मात्र नंतर कृष्णाने अर्थात वामनाने आपले अवाढव्य रुप सादर केले. त्याने एक पाऊल स्वर्गावर ठेवले तर दुसरे पृथ्वीवर. मात्र तिसरे पाऊल ठेवायला त्याला जागा उरली नाही. मग शब्द दिल्याप्रमाणे बली राजाने आपल्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवावे, असे वामनाला म्हटले.अशाप्रकारे बलीराजाचा गर्व कुठच्या कुठे निघून गेला आणि तो नम्रतेत आला. त्यामुळे नम्रतेचे प्रतिक म्हणून आणि गर्वाचा नाश म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
दिवाळी पाडवा
पाडव्याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. यादिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळतात. त्यांच्या आवडीचे जेवण करुन त्यांना खाऊ घालतात. पती-पत्नीमधील प्रेम आणि सहवास वृध्दींगत व्हावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पती आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून पत्नीला एखादी भेटवस्तु देतो. नवविवाहीत जोडप्यांसाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि विशेष असतो.
भाऊबीज
जगात फक्त भारतातच भाऊबीजेसारखं पवित्रं नातं साजरं केलं जातं. या नात्यात प्रेम, रुसवे-फुगवे, खोड्या, सहकार्य, मदत, गंमती, मजा-मस्ती अशा सर्व गोष्टी पाहायला मिळतात. यादिवशी बहिण भावाला ओवाळते. ते दोघे एकमेकांना भेटवस्तु देतात. गोड-धोड खाऊ घालतात. लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणी किंवा कामानिमित्त बाहेर राहणारा भाऊ यांची यानिमित्ताने वर्षभरातून एकदा भेट होते. सर्व कूटुंब यानिमित्ताने एकत्र येतं.
जगभरात तसंच देशभरात दिवाळी साजरी होत असली तरी प्रत्येक ठिकाणी त्याचे स्वरुप वेगळे असते. हा सण भारतात लांबीने आणि महत्त्वाने फार मोठा मानला जातो. दरम्यान लोकं सर्व कूटुंब, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींची भेट घेतात. त्यांना फराळांची आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करतात. अशाप्रकारे मोठ्या जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या या सणाची लोकं वर्षभर वाट पाहत असतात.