आॅनलाइन उत्पादने स्वस्त का असतात? खरेदीचे फॅड वाढले, रिवॉर्ड पॉइंट्स, कॅश बॅक, व्हॅल्यू पॅकपासून सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:03 AM2017-10-16T04:03:52+5:302017-10-16T04:05:55+5:30
सध्या आॅनलाइन उत्पादने खरेदी करण्याचा कल प्रचंड वाढला आहे. विशेषत: पन्नाशीच्या आतील मंडळी तर आॅनलाइन ज्वराने पछाडलेली दिसत आहेत. हे फॅड इतके का वाढले, त्याचा लोकमतने आढावा घेतला तेव्हा काही निष्कर्ष समोर आले.
सोपान पांढरीपांडे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या आॅनलाइन उत्पादने खरेदी करण्याचा कल प्रचंड वाढला आहे. विशेषत: पन्नाशीच्या आतील मंडळी तर आॅनलाइन ज्वराने पछाडलेली दिसत आहेत. हे फॅड इतके का वाढले, त्याचा लोकमतने आढावा घेतला तेव्हा काही निष्कर्ष समोर आले.
आॅनलाइन उत्पादने स्वस्त व सोयीची
सध्या तरुण पिढीमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादने उदा. मोबाइल, आयपॅड लॅपटॉपपासून ते साध्या ब्ल्यूटूथ हेडसेटपर्यंत अन् फॅशन गारमेंटस् घेण्याची अहमिका लागली आहे. बहुतेक वेळा ही उत्पादने बाजारातील दुकानांपेक्षा स्वस्त असतात व उत्पादन हाती पडताच पैसे देण्याची सोय असल्याने आॅनलाइनचा बाजार सध्या गरम आहे.
आॅनलाइन व्यापार कसा चालतो?
आॅनलाइन व्यापार करणाºया कंपनीजवळ कुठलेही दुकान नसते. पण ही कंपनी अनेक उत्पादक व आयात करणाºया कंपनीशी माल विकून देण्याचा घाऊक करार करत असते. बरेचदा हा करार हजारो/लाखो नग विकून देण्याचा असतो; त्यामुळे उत्पादक /आयातदार अगदी कमी किमतीत हा करार करतात. ग्राहकाने आॅर्डर नोंदवली की आॅनलाइन कंपनी ती उत्पादक/आयातदाराला फॉरवर्ड करते व तो ग्राहकास माल पाठवत असतो. पण पॅकिंगवर मात्र आॅनलाइन कंपनीचे नाव असते.
किमती कमी का असतात?
आॅनलाइन कंपनीजवळ दुकान नसल्याने दुकानाचे भाडे/घसारा, नोकरांचा पगार, कर्जाचे व्याज, आस्थापना खर्च आणि विशेष वस्तू फॅशनबाह्य झाल्यामुळे होणारे नुकसान या सर्व खर्चाची बचत होत असते. किरकोळ व्यापारात हा खर्च विक्री किमतीच्या ५ ते २५ टक्क्यांपर्यंत असतो. तो वाचल्यामुळे आॅनलाइन उत्पादने स्वस्त असतात आणि ती विकण्यासाठी मग कंपन्या अगदी ५० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट (सवलत), विशिष्ट कार्डाने पैसे दिले तर अधिकची सवलत, कॅश बॅक, रिवॉर्ड पॉर्इंटस, व्हॅल्यू पॅक इत्यादी ग्राहकांना आकर्षित करीत असतात.
‘बर्निंग द मनी’
आॅनलाइन उत्पादने खरेच स्वस्त आहेत का, याचीही पडताळणी ‘लोकमत’ने केली. भारतातील एका नामांकित कंपनीचा १.५ टन क्षमतेचा फाइव्हस्टार एअरकंडिशनर (एसी) नागपूरच्या एका लोकप्रिय दुकानात ३७५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पण तोच एसी आॅनलाइन कंपनी क्रमांक एकच्या वेबसाईटवर ३२००० रुपयांत उपलब्ध आहे तर आॅनलाइन कंपनी क्रमांक दोनच्या वेबसाइटवर चक्क २८९९० रुपयांत दाखवला आहे. चौकशी केली असता हे एसीचे जुने मॉडेल असल्याने आॅनलाइन कंपन्या त्यांच्या करारातील टार्गेट पूर्ण करण्यासाठी कमी किमतीत विकत असल्याचे कळले. आॅनलाइन रिटेलिंगमध्ये याला ‘बर्निंग द मनी’ (पैसा जाळणे) असे संबोधले जाते.
कॅश बॅक/रिवॉर्ड पॉइंट्सपासून सावध
कार्डाद्वारे होणा-या व्यवहारांवर बँका/वित्तीय कंपन्यांना एक ते तीन टक्के कमिशन प्राप्त होत असते. त्यामुळे कार्डाचा अधिकाधिक वापर व्हावा म्हणून या कंपन्या कॅशबॅक, रिवॉर्ड पॉर्इंट्स इत्यादींचे लालूच ग्राहकांना दाखवत असतात. परंतु सावधान.
च्ही कॅशबॅकची रक्कम किंवा रिवॉर्ड पॉर्इंट्सची रक्कम तुम्हाला त्या बँकेच्या किंवा तिच्या प्रतिनिधी कंपनीच्या आॅनलाइन ‘विशिष्ट’ दुकानातूनच खरेदी करावी लागतात. खुल्या बाजारात ते कुणी वटवत नाहीत आणि या ‘विशिष्ट’ दुकानामध्ये वस्तूच्या किमती प्रचंड महाग असतात. आॅनलाइन व्यवहारात दिलेली सवलत अशा पद्धतीने ग्राहकाच्या परोक्ष परत घेण्याचा हा प्रकार असतो.
च्सध्या दिवाळीची खरेदी सुरू आहे व आॅनलाइन खरेदीही जोरात आहे. तेव्हा आॅनलाइन उत्पादने जरूर मागवा पण कॅशबॅक, रिवॉर्ड पॉर्इंटस वटविण्याच्या मोहात मात्र पडू नका.