‘पारदर्शकवाले’ युती का करत आहेत?
By admin | Published: January 18, 2017 06:29 AM2017-01-18T06:29:55+5:302017-01-18T06:29:55+5:30
मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा भाजपाच्या नेत्यांनी बाहेर काढला.
मुंबई : मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा भाजपाच्या नेत्यांनी बाहेर काढला. शिवसेनेवर त्यांनी थेट आरोप केले. आता तेच लोक शिवसेनेसोबत युतीची बोलणी करत आहेत. भाजपाला नेमकी कसली पारदर्शकता हवी आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. परळ येथील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
परळ येथील महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे यांच्या सभेद्वारे राष्ट्रवादीने मुंबईतील प्रचाराच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, राष्ट्रवादी युवतीच्या मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, तसेच सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
या वेळी सुळे म्हणाल्या की, एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे युतीसाठी वाटाघाटी करायच्या, यालाच ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणायचे का, सत्तेत राहून परत पारदर्शकतेचीही भाषा केली जाते. राज्यात गुन्हेगारी शून्य व्हावी, असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणतात. मात्र, दुसरीकडे भाजपामध्ये गुंडांना वाजतगाजत प्रवेश दिला जातो. हेच भाजपाचे ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे का, अशा शब्दांत त्यांनी भाजपाचा समाचार घेतला. भाजपाचा थेट आरोप शिवसेनेवर आहे, मग आता यांच्यात युती होणार असेल, तर सर्व भ्रष्ट लोक एकत्र येत आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
राष्ट्रवादी विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवते. मुंबईतील सध्याच्या स्थितीला सत्ताधारी जबाबदार आहेत. मुंबईचा विकास फक्त राष्ट्रवादीच करू शकते. शिवसेनेच्या ‘डिड यू नो?’ या टॅगलाइनला आमचे ‘यू शुड नो’ हे उत्तर असेल, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
>पूर्वी शिवसेना आणि मनसे व्हॅलेंटाइन डेला विरोध करायचे. आता ते सेलिब्रेट करत आहेत. आता ते मॉडर्न होत आहेत. त्यांच्या नेत्यांची मुलेच इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकत आहेत, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना लगावला.
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या मुंबईतील वॉर रूममध्ये बसून प्रचारकामाचा आढावा घेतला.