लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू अशी भीती का वाटतेय? राऊतांचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:17 PM2024-08-17T12:17:25+5:302024-08-17T12:17:45+5:30
देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे राज्य चालू होते शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीने सध्या फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत आहेत. - संजय राऊत
महाराष्ट्रात हे असे कोण लागून गेले यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू, महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्य केलं नाही का? या राज्याला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. योजना बंद करण्याचे सुडाचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केले होते, आम्ही त्याच्यामध्ये नाही आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही, अशी टीका ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे राज्य चालू होते शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीने सध्या फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत आहेत. अनागोंदी, अराजक, लुटमार हे सर्व घाशीराम कोतवाल आहेत तीन, असा आरोपही राऊत यांनी केला. आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू अशी त्यांना भीती का वाटत आहे? राज्य जाईल ही त्यांची भीती आहे. हरतो आहोत ही त्यांची भिती आहे, म्हणून फडणवीस धमक्या देत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नाव बदलून काँग्रेसच्या योजना चालवलेल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी काहीही केले नाही. काँग्रेसच्या ज्या योजना होत्या वर्षानुवर्ष व गरिबांच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीत, सामाजिक न्याय बाबतीत या सगळ्या योजना त्यांनी फक्त नाव बदलली. संस्थांची योजनांची इमारतींची आणि त्या चालू केल्या, योजना त्याच आहेत. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे. फडणवीस यांनी आता आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करावी. ज्या प्रकारचे दळभद्री आणि डर्टी पॉलिटिक्स त्यांनी सुरू केले त्याचा अंत आता जवळ आला आहे, असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला.
नरेंद्र मोदींवर राऊतांची टीका
नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात वन नेशन वन इलेक्शन ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र येऊ शकत नाही . झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र फक्त चार राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही. ते वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करत आहेत खोटारडे कुठले लोकांना मूर्ख बनवत आहेत. महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे. झारखंडमध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे, अशी टीका राऊत यांनी मोदींवर केली.
लाडकी बहीण योजना हा सत्ताधाऱ्यांसाठी टर्निंग पॉईंट नाही असे राऊत म्हणाले. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी यापूर्वी आलेल्या आहेत. ते काही दीड हजार रुपये काही खिशातले देत नाहीत. लोकांच्या करातला पैसा आहे या योजनेचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. आमचे सरकार येईल तेव्हा पंधराशे ऐवजी आम्ही 3000 करू हा आमचा शब्द आहे, असेही राऊत म्हणाले.