… यामुळे आव्हाड भाजपला मूर्ख म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 02:55 PM2019-12-19T14:55:52+5:302019-12-19T14:56:55+5:30
सुरवातीलाच ठाकरेंवर मानसिक दबाव कसा आणला जाईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत.
मुंबई: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी विविध प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र आपल्या आक्रमकतेला साथ देईल असे भाजपला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी शेतकरी प्रश्न व इतर मुद्यांवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर काही वेळापूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारांसहित सभात्याग केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राज्यासाठी कोणतीही ठोस आश्वासने नसल्यामुळे सभात्याग करीत असल्याचे ते म्हणाले.
तर जितेंद्र आव्हाड यांनी याच मुद्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. अवघ्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपकडून हल्ला करण्यात आला. सुरवातीलाच ठाकरेंवर मानसिक दबाव कसा आणला जाईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांनी सुद्धा लाखोच्या सभा घेतल्या आहेत. त्यामुळे असे काही केल्याने ठाकरेंवर दबाव येणार नसल्याचे आव्हाड म्हणाले.
तसेच जगातील लोकशाहीमध्ये हा नियम आहे की, कोणतेही नवीन सरकार स्थापन झाल्यास त्यांना किमान सहा महिने कामकाज समजण्यासाठी वेळ दिला जात असतो. त्यांनतर विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे. विरोधकांनी विरोध करू नयेत असे माझे म्हणणे नाही, मात्र लोकशाहीचे काही अलिखित नियम असतात ते सुद्धा पाळले गेली पाहिजे असेही आव्हाड म्हणाले.