चंद्रकांतदादा, असे का वागलात?

By Admin | Published: January 15, 2015 10:39 PM2015-01-15T22:39:14+5:302015-01-15T23:27:31+5:30

शेतकऱ्यांचा संतप्त सवाल : आटपाडीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण?

Why Chandrakant Dada? | चंद्रकांतदादा, असे का वागलात?

चंद्रकांतदादा, असे का वागलात?

googlenewsNext

अविनाश बाड -आटपाडी -रोम जळत असताना निरो राजा उंच टेकडीवर बसून ‘फिडेल’ वाजवत होता. इतिहासातील गाजलेल्या या गोष्टीचा अगदी तसाच जळजळीत अनुभव सध्या आटपाडीतील शेतकरी घेत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पणनमंत्री चंद्रकांत पाटील आटपाडीत आले आणि डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नाऐवजी त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीतच अधिक रस दाखविला. त्यांच्या या भूमिकेने डाळिंब उत्पादकांच्या नैराश्येत भर पडली. नैराश्येचा पहिला बळी बुधवारी गेला. चंद्रकांतदादा, या आत्महत्येस जबाबदार कोण? असा प्रश्न आता संतप्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
शेतमालाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्याने निर्यात कमी होईल आणि देशांतर्गत आवक वाढली, तर मागणीपेक्षा पुरवठा जादा झाल्यास आपोआप स्वस्ताई येईल, या केंद्र शासनाच्या धोरणांमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अत्यंत कमी प्रमाणात डाळिंबाची निर्यात होत असल्याने आणि थंडीचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी डाळिंबाची निम्म्या दराने खरेदी सुरू केली आहे.
थंडी संपेल आणि दर वाढतील, या आशेने शेतकरी डाळिंबे पक्व होऊनही तोडण्यास उशीर करत आहेत. त्यामुळे हजारो डाळिंबे जमिनीवर पडून फुटत आहेत. ही उललेली डाळिंबे ज्यूस आणि अनारदाना उद्योग बंद असल्याने खरेदी होत नाहीत. त्यामुळे अनेक बागांतून टनाने अशी उलकी डाळिंबे शेतकऱ्यांना अक्षरश: कचऱ्यात फेकून द्यावी लागत आहेत.
अशी सगळी इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली असताना, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पणनमंत्री गेल्या रविवारी (दि. ११ जानेवारीला) आटपाडीत मंत्री झाल्यावर पहिल्यांदा आले. स्रेह्यांच्या निवासस्थानी ते रमले. व्यापारी पेठेतून सत्कार स्वीकारत बाजार पटांगणातील कार्यक्रमाच्या स्थळी गेले. राज्यात बदललेल्या सरकारचे मंत्री पहिल्यांदा आटपाडीत आले, म्हणून मोठ्या आशेने तालुकावासीय कार्यक्रमाला आले होते. पण तालुकावासीयांच्या पदरी घोर निराशा पडली. इथला डाळिंब उत्पादकांचा ज्वलंत प्रश्न त्यांना माहीत नसेल, तर इथे येण्यापूर्वी त्यांना कुणीच कशी माहिती दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला. त्यांना शेतकरी, अडतदार भेटले. थोडा वेळ जाता-जाता बाजार समितीतील डाळिंब सौद्यांना भेट देण्याची विनंती केली, पण कसले काय?
ते म्हणाले, उपस्थित प्रत्येकांनी मोबाईल काढा आणि मी सांगतो त्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन भाजपचे सदस्य व्हा. ज्या पणन विभागाची शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्याची जबाबदारी आहे आणि ज्या विभागाला नुसत्या आटपाडीतून ६८ लाख रुपये कररूपाने मिळतात, त्या विभागाचे मंत्री आटपाडीत येऊन डाळिंब उत्पादकांची व्यथा समजून घेऊन त्यावर काही उपाययोजना करणार नसतील, तर याला काय म्हणावे?

Web Title: Why Chandrakant Dada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.