जालना इथं धनगर समाज आक्रमक का झाला?: गोपीचंद पडळकरांनी संपूर्ण घटना सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:21 PM2023-11-21T17:21:01+5:302023-11-21T17:21:36+5:30

राज्यभरातील सर्व समाजाला मी शांततेचे आवाहन करतो. आपल्याला आरक्षण शांततेच्या मार्गाने सरकारकडे पाठपुरावा करून मिळवायचे आहे असं आवाहन पडळकरांनी केले.

Why Dhangar community became aggressive in Jalna?: Gopichand Padalkar narrated the whole incident | जालना इथं धनगर समाज आक्रमक का झाला?: गोपीचंद पडळकरांनी संपूर्ण घटना सांगितली

जालना इथं धनगर समाज आक्रमक का झाला?: गोपीचंद पडळकरांनी संपूर्ण घटना सांगितली

मुंबई - मराठा आरक्षणावरून एकीकडे राजकारण तापलं असताना दुसरीकडे धनगर समाजाचे आंदोलनही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जालना इथं निवेदन देण्यासाठी गेलेल्या धनगर समाजाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. यात वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. जालनातील धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसून आले. नेमकं हे का घडलं याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट सांगितले आहे. 

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यभरात सगळीकडे धनगर समाज आपल्या आरक्षणासाठी मागणीसाठी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना शांततेत निवेदन देत आहे. जालना इथं आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना सोमवारी भेट दिली. निवेदन देणार असल्याचे सांगितले. परंतु आज धनगर बांधव मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यास गेले परंतु त्यावेळी जिल्हाधिकारी आले नाहीत. १ तास वाट पाहिल्यानंतरही वारंवार आवाहन करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संताप अनावर झाला आणि त्यातून तोडफोड झाली. तोडफोडीचे आम्ही समर्थन करत नाही परंतु हे प्रशासकीय अधिकारी आहेत, या लोकांना आरक्षणाचे गांभीर्य असण्याची आवश्यकता होती. परंतु ते होताना दिसत नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच राज्यभरातील सर्व समाजाला मी शांततेचे आवाहन करतो. आपल्याला आरक्षण शांततेच्या मार्गाने सरकारकडे पाठपुरावा करून मिळवायचे आहे. कायदा हातात घेऊन काही करायचे नाही. जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आक्रमक न होता पुढच्या सर्व प्रक्रिया पार पाडाव्यात. आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर बळजबरी करू नका. खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना त्रास देऊ नका. असे प्रकार करू नये असं आमचे जालना जिल्हा प्रशासनाला आवाहन आहे असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. 

दरम्यान, मी पोलीस अधीक्षकांशी बोलून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नये अशी विनंती करणार आहे. सरकारने या गोष्टीत मार्ग काढला पाहिजे. लोकांची भावना ताबडतोड आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे असं वाटते. सरकार यातून मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे. सरकारने तात्काळ कार्यवाही करावी. सरकारने धनगर आरक्षणाबाबतीत ठोस भूमिका घेतली पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय वेगळा आहे. धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी आहे. आमची नव्याने समावेश करा अशी आमची मागणी आहे. राज्यातील ३३ आदिवासी जातींवर अन्याय का केला जातोय असा सवालही आमदार गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे. 

Web Title: Why Dhangar community became aggressive in Jalna?: Gopichand Padalkar narrated the whole incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.