बॉलिवूडवाल्यांच्या नरड्यास आता बूच का लागले ? उद्धव ठाकरे संतापले
By Admin | Published: March 17, 2017 07:48 AM2017-03-17T07:48:34+5:302017-03-17T08:37:17+5:30
नाहीद आफरीन प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूडला चांगलंच धारेवर धरलं असून नरडय़ास आता बूच का लागले आहे? असा संतप्त सवाल विचारला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - नाहीद आफरीन प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूडला चांगलंच धारेवर धरलं असून एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्य, असहिष्णुता वगैरेंबद्दल घसे फोडणाऱ्या मंडळींनी याप्रकरणी स्वीकारलेल्या सोयिस्कर मौनाचे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरेंसाठी छाती पिटणाऱयांत तुमचे ते बॉलीवूडवालेही एरवी आघाडीवर असतात, मग आफरीनवर होत असलेल्या अन्यायाबाबत त्या बॉलीवूडवाल्यांच्या नरडय़ास आता बूच का लागले आहे? असा संतप्त सवाल विचारला आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.
बॉलिवूडवाल्यांवर टीका -
संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’ चित्रपटातील महिला विटंबनेच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला त्यांच्या विरोधात काहींनी थेट संसदेत प्रश्न विचारले, मात्र त्यांनाही नाहीद आफरीनच्या बाजूने उभे राहावे असे वाटले नाही. पाकिस्तानातील कलाकारांना हिंदुस्थानात रोखणे हे दहशतवादी कृत्य आहे असे ज्यांना वाटते त्यांनी आफरीनच्या गाण्याविरोधात फतवे जारी करणाऱ्यांचा साधा निषेधही केलेला नाही. महेश भट, जया बच्चन अशांनी तर नाहीदच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून फतव्यांचा धिक्कार केला पाहिजे. हिंदुस्थानात गुदमरण्यापेक्षा देश सोडलेला बरा असे मध्यंतरी आमीर खान व त्याच्या पत्नीला वाटत होते. आफरीनच्या गुदमरण्यावर मात्र सगळय़ाच खानांची बोलती बंद झाली आहे. हे धक्कादायक आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
जसे पाकड्यांचे हे दहशतवादप्रेम कमी होत नाही तसे आमच्या देशातील मुल्ला-मौलवींचे ‘फतवाप्रेम’ही कमी झालेले नाही. आपला देश भले एकविसाव्या शतकात वगैरे पोहोचला असेल, पण धर्मांध मुल्ला आणि मौलवी मात्र आजही मध्यकालीन युगात जगत आहेत. हा एक मानसिक रोग असून आसामची नवोदित गायिका नाहीद आफरीन हिला याच विकृतीची किंमत सध्या मोजावी लागत आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
खुद्द पाकिस्तानातही मौलवींच्या ‘फतवे’शाहींविरुद्ध महिलांनी बंड केलेच आहे. मलाला या शाळकरी मुलीने दहशतवाद्यांच्या गोळय़ा झेलून फतवेशाहीविरोधातील स्वातंत्र्याच्या लढाईचा अग्नी पेटता ठेवला आहे. पाकिस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रात महिला सिनेमा आणि रंगमंचावर काम करीत आहेत. मग पाकिस्तान आणि इतर इस्लामी देशांमध्ये जर धर्मांधांचे फतवे कुचकामी ठरत आहेत तर आसाममधील हे ४६ मौलवी फतव्याची फडफड का करीत आहेत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
मुळात फतवा आणि बुरखा यामुळे मुस्लिम महिलांचे जीवन अंधकारमय झाले आहे. ‘तिहेरी तलाक’ने मुस्लिम स्त्रीला गुलाम, बेसहारा बनवले आहे. आता या सर्व अत्याचाराविरोधात मुस्लिम महिलांच्या मनात असंतोषाची आणि लढ्याची ठिणगी पेटली आहे. त्याचे भान फतवेबाज मुल्ला-मौलवींनी ठेवले नाही तर त्यांच्या दाढीला हात घालण्याचे बळ या महिलांच्या मनगटात नक्कीच येईल. नाहीद आफरीनची लढाई एकाकी नाही हे समाजाने दाखवून देण्याची गरज आहे. मुस्लिमांसह समाजातील सर्वच धर्मीय लोकांनी आफरीनची लढाई ही स्वतःची लढाई मानायला हवी असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.