कोल्हापूरकरांनी ‘जयप्रभा’ का नाही विकत घेतला?
By admin | Published: December 24, 2014 12:05 AM2014-12-24T00:05:05+5:302014-12-24T00:19:41+5:30
नाना पाटेकरांचा सवाल : देवल क्लब, अवनि, चेतनाची स्वीकारली जबाबदारी --राजदत्त यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार प्रदान
कोल्हापूर : कोल्हापूरला फार मोठी कलापरंपरा आहे, चित्रपटपरंपरा आहे; पण आता आपण फक्त इतिहास सांगतोय. त्याचे अनुकरण करीत नाही. जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी नुसती आंदोलने करून चालणार नाही. या शहरात समृद्धता नांदत असताना कोल्हापूरकरांनी का नाही हा स्टुडिओ विकत घेतला? असा सवाल आज, मंगळवारी अभिनेता नाना पाटेकर यांनी विचारला. मी स्वत: यात काही वाटा उचलायला तयार होतो; पण कुणीच प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना सिनेमा केसरी कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या ओघवत्या आणि काहीवेळा विनोदी शैलीतून कोल्हापूरकरांच्या नेमक्या उणिवांवर बोट ठेवले. तसेच गायन समाज देवल क्लब, अवनि आणि चेतना विकास मंदिर या तीन संस्थांना आर्थिक सहकार्य मिळवून देण्याची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे झोन मॅनेजर कैलाश परमार उपस्थित होते.
पाटेकर म्हणाले, इतिहासाचे दाखले सगळेच देतात. त्यातील एक अंश घेतला तर त्याचा उपयोग होतो. जयप्रभा वाचवायचा असेल तर लताबार्इंना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कोल्हापुरात खूप पैसा आहे. येथील प्रत्येक माणसाने आपल्या खिशातला एक रुपया काढला तरी हा स्टुडिओ वाचला असता. मी स्वत: त्यातला काही वाटा उचलायला तयार होतो; पण कुणीच पुढाकार घेतला नाही. आपण इतके संवेदनाशून्य झालो आहोत का? आपली परंपरा वाचविण्यासाठी आणि गतवैभव मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे. ‘किफ’च्या निमित्ताने चित्रपटपरंपरेचे बीज पुन्हा रोवले आहे, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी पाणी घालून त्याचे संवर्धन करा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी लघुपट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. दिलीप बापट यांनी मानपत्राचे वाचन केले. चारूदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
कुठे गेली ती माणसं?... आणि लौकिकही
पुरस्कारानंतर राजदत्त यांनी अत्यंत उद्विग्नतेने कोल्हापूरबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मी आज जे काही यश मिळवू शकलो त्यासाठीचे सामर्थ्य या कोल्हापूरने दिले. समाजातील उणिवा कलात्मक पद्धतीने प्रेक्षकांच्या मनात रुजविणारे चित्रपट निर्माण करून चित्रपटसृष्टीला ज्यांनी वेगळी बैठक दिली, त्या कलामहर्षींची चित्रपटसृष्टी आज यात मातीत दिसत नाही. माणसंही नाहीत, कुठे गेलं हे सगळं? आज इथे कुणी येत नाही, शासनाने कुणाला काय दिले माहीत नाही; पण आता या मातीची परंपरा, लौकिक सगळंच अशा पद्धतीने दिसेनासं झालंय की, त्याचे प्रतिध्वनीसुद्धा ऐकू येत नाहीत.
लघुपट स्पर्धेचे निकाल असे :
कथात्मक प्रथम : ग्लास (नवीन पद्मनाभ), द्वितीय : विलग (तुषार परांजपे), तृतीय : प्रिय (मयूरेश गोटखिंडीकर), दादा (अश्विनी घैसास).
अकथात्मक : प्रथम : द सारंगी प्लेअर (अनुप वर्गीस), द्वितीय : रूटस (अंतरा आनंद), सहारा रायडर्स (देवेंद्र मेहर)
गुरूंना वंदन : कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मंंगळवारी सिनेमाकेसरी कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभात अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यासपीठावरच ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले.