मनसेचा नमो निर्माण पक्ष का झाला? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:06 AM2024-04-10T11:06:13+5:302024-04-10T11:09:29+5:30
Sanjay Raut : भाजपाने राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाने राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
गेल्या काही काळापासून महाराष्ट्राची अक्षरश: लूट सुरू आहे, खोक्याचं अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आहेत. राज्यातून उद्योग पळवला जातोय, मुंबई तोडण्याचा, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला जो पक्ष आहे, तोच महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका उत्पन होतात. त्याचीच उत्तर त्यांना (राज ठाकरे) द्यावी लागतील. असं काय घडलं की तुम्ही राज्याच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात, असा प्रश्न लोकं त्यांना विचारतील. तुमचा जो 'नवनिर्माण पक्ष' आहे, त्याचा 'नमो निर्माण पक्ष' का झाला? त्याची का गरज पडली? हे राज ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर, आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी लढत आहोत. समोर नरेंद्र मोदी असोत की अमित शाह,आम्ही शरणगती पत्करणार नाही. आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपासोबत राहिलो नाही. हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळात ही युती केली होती. ती २५ वर्ष चालली. पण भाजपाने जेव्हा त्यांचे खरे दात दाखवायला सुरूवात केली, तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आमची स्वतंत्र भूमिका घेतली, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
राजकारणातून ओवाळून टाकलेले नेते भाजपाने आपल्याकडे घेतले आहे. त्यातील हे एक हे महाशय (राज ठाकरे) आहेत का नमो निर्माण वाले? पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्यभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात वॉशिंगमशीन मध्ये घेऊन साफ करण हा व्यभिचार नाही का? त्याच व्यासपीठावर पाय ठेवला असेल तर राज ठाकरेंना लोकांना उत्तर द्याव लागेल, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, अजित पवार ,हसन मुश्रीफ अशी अनेक नावे आहेत, ज्यांनी बिनशर्त भाजपासोबत जायचं मान्य केले. ते का गेले कोणाच्या दबावामुळे गेले हे सर्वांना माहीत आहे. मला असं वाटत नाही त्यांचं (राज ठाकरे) असं झालं असेल. पण शरणागती त्यांनी यासाठी पत्करली की त्यांच्या अनेक फाइली उघडल्या गेल्या, धमक्या दिल्या. त्यामुळे असं वाटतं व्यभिचार हा भाजपाचा जगजाहीर आहे, असे संजय राऊत म्हणाले.