मोदी...चार वर्षात अयोध्येत का गेले नाही? उद्धव यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:27 AM2018-10-19T05:27:13+5:302018-10-19T06:36:45+5:30

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी इंधन दरवाढ, महागाई, काश्मीर, राज्यावर आलेले दुष्काळाचे सावट आणि राम मंदिराच्या मुद्यावरून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले.

Why did not go for four years to ayodhya? The question of Uddhav | मोदी...चार वर्षात अयोध्येत का गेले नाही? उद्धव यांचा सवाल

मोदी...चार वर्षात अयोध्येत का गेले नाही? उद्धव यांचा सवाल

Next

मुंबई : जगभर फिरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वर्षात एकदाही अयोध्येला का गेले नाही, असा सवाल करत, आता राममंदिराची उभारणी शिवसैनिकच करतील आणि आपण स्वत:ही २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहोत, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.


शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी इंधन दरवाढ, महागाई, काश्मीर, राज्यावर आलेले दुष्काळाचे सावट आणि राम मंदिराच्या मुद्यावरून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार हा जसा तुमचा निवडणूक जुमला होता तसाच राममंदिरही जुमलाच होते हे तुम्ही जाहीर करून टाका. दरवर्षी आपण रावण जाळतो पण तो पुन्हा उभा राहतो. राममंदिर मात्र बनत नाही. राममंदिराची आठवण करून देण्यासाठी मी आयोध्येला येतोय, असे ते मोदींना उद्देशून म्हणाले.


रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवात राममंदिर उभारण्याचा निर्धार केल्याबद्दल ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. बाबरी मशीद पडली तेव्हा भलेभले शेपूट घालून पळाले होते पण तेव्हा उसळलेला आगडोंब शिवसैनिकांनीच रोखला होता, असे ते म्हणाले.
ठाकरेंच्या भाषणात मुख्य लक्ष्य होते ते पंतप्रधान मोदीच. गोरगरीब जनता तुमच्याकडे शेवटची आशा म्हणून पाहत आहे. त्यावर तुम्ही पाणी फेरले तर जनतेच्या ज्वालामुखीत जळून नष्ट व्हाल. देशाच्या पत्रिकेत सध्या शनि, मंगळ वक्री झालेले आहेत अन् त्यांना सरळ करण्याची ताकद शिवसैनिकांमध्येच आहे, असे त्यांनी मोदी, शहा यांचे नाव न घेता सुनावले. उद्या तुम्ही शिर्डीत येत आहात, तिकडच्या दुष्काळी भागातही जा. थापा मारू नका त्यांना काहीतरी देऊन जा, असे आवाहन त्यांनी मोदींना केले.


व्यासपीठावर युवा नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री अनंत गीते, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे हे राज्यातील मंत्री, खा.चंद्रकांत खैरे, सुधीर जोशी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांनाही सुनावले
कर्नाटकमध्ये सरकार दुष्काळ जाहीर करून मोकळे झाले. इथे आपले मुख्यमंत्री अहवालच मागवत बसले आहेत. मग ते अभ्यास करतील, काथ्याकूट करत बसतील. दुष्काळ व्यवस्थापनाचा अजून मागमूस नाही. दुष्काळ तातडीने जाहीर केला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.

सत्तेत मात्र कायमच!
केंद्र आणि राज्यात शिवसेना भाजपाबरोबर सत्तेत कायम राहणार असल्याचे ठाकरे यांच्या भाषणावरून स्पष्ट झाले. जनतेसाठी सरकारविरुद्ध बोलतच राहणार हे सांगताना त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याविषयी काहीही विधान केले नाही. सत्तेला चिकटून असतात म्हणून आमच्यावर टीका करता मग आज रा.स्व.संघही सरकारविरोधात बोलू लागला आहे. त्यांच्यामुळे मोदी सत्तेत आले मग मोदींना सत्तेतून घालवा, असे संघाला सांगणार का असा सवाल त्यांनी टीकाकारांना केला. संघ कानपिचक्या देतो आम्ही थेट कानाखाली आवाजच काढतो, असेही ते म्हणाले.

नेत्यांच्या भाषणाला उद्धव यांचा खो
खा.संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाषणामध्ये भाजपा आणि नरेंद्र मोदींना शिवसेना गाडणार आणि भगवा फडकवणारच असे वारंवार त्वेषाने सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मात्र, अशी भाजपा वा मोदींना गाडण्याची कुठलीही भाषा केली नाही. उलट, तुमचा पराभव झाला पाहिजे अशी विकृती आमच्या मनात नाही पण गोरगरीब जनतेच्या आशेवर पाणी फिरले तर ती ज्वालामुखी बनून तुम्हाला नष्ट करेल असे ते म्हणाले. पाच राज्यांतील निवडणुकीनंतर महागाई, पेट्रोलचे दर कमी करणार अशी हमी देणार असाल तर तुम्ही न बोलविता तुमच्या प्रचाराला मी येईन, असे ठाकरे म्हणाले.

मी टू.. कानाखाली आवाज काढा
महिलांवरील अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करताना ‘मी टू’बाबत ते म्हणाले की, हा गंभीर विषय आहे. ज्यांच्याविषयी तक्रारी आहेत त्यांची चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींना फासावर लटकवलेच पाहिजे पण जिथे निर्भया, कोपर्डीच्या दोषींना फाशी झाली नाही तिथे पाच-दहा वर्षांनी मी टू ची तक्रार करून काय होणार? त्यापेक्षा मी टूमधील लोकांच्या तिथेच कानाखाली आवाज काढून मोकळे व्हा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.


नितीनजी, हे शोभत नाही !
निवडणुकीत जिंकू असे वाटले नव्हते; त्यामुळे आम्ही आश्वासने देत सुटलो या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा उद्धव यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, असा कोडगेपणा, निर्लज्जपणा मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीला शोभणारा नाही.

Web Title: Why did not go for four years to ayodhya? The question of Uddhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.