‘देशभक्त’ विमान कंपन्यांनी मल्ल्याला विमानात चढण्यापासून का रोखले नाही? - उद्धव ठाकरे

By admin | Published: April 20, 2017 07:56 AM2017-04-20T07:56:08+5:302017-04-20T08:21:01+5:30

विजय मल्ल्यांची ब्रिटनमधील अटक व सुटका म्हणजे एक सोहळाच ठरला. मल्ल्यांच्या औटघटकेच्या अटकेचे श्रेय जे घेत आहेत त्यांनी ‘सुटके’चे श्रेयसुद्धा घ्यावे.

Why did "patriotic" airlines not prevent Mallya from boarding the plane? - Uddhav Thackeray | ‘देशभक्त’ विमान कंपन्यांनी मल्ल्याला विमानात चढण्यापासून का रोखले नाही? - उद्धव ठाकरे

‘देशभक्त’ विमान कंपन्यांनी मल्ल्याला विमानात चढण्यापासून का रोखले नाही? - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 20 - ब्रिटनमध्ये विजय मल्ल्याला झालेली अटक आणि सुटकेवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारच्या बरोबरीने विमान कंपन्यांवर निशाणा साधला आहे. विजय मल्ल्यांची ब्रिटनमधील अटक व सुटका म्हणजे एक सोहळाच ठरला. मल्ल्यांच्या औटघटकेच्या अटकेचे श्रेय जे घेत आहेत त्यांनी ‘सुटके’चे श्रेयसुद्धा घ्यावे असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
‘मल्ल्यास पकडून कधी आणणार?’ असे सवाल देशात सातत्याने विचारले जात आहेत. काँग्रेस राजवटीत मल्ल्यांनी कर्ज घेतले व बुडवले, पण भाजप राजवटीत हे महाशय पळून गेले. तेव्हा सरकारी यंत्रणा झोपा काढत होती काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे. 
 
हिंदुस्थानी विमान कंपन्यांचा पाहुणचार घेतच ते लंडन येथे उतरले व तेव्हादेखील मल्ल्या यांच्या फसवणुकीचे प्रताप जगजाहीर झालेच होते. मग या ‘देशभक्त’ विमान कंपन्यांनी मल्ल्या यांना विमानात चढण्यापासून का रोखले नाही किंवा सरकारी तपास यंत्रणांना कळवून ‘राष्ट्रीय’ इमानदारीचे कर्तव्य का पार पाडले नाही? शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड प्रकरणात विमान कंपन्या ‘बंदी’ हुकूम बजावतात व देश बुडवणाऱ्या मल्ल्यांना पळून जाण्यास मदत करतात. जणू काही मल्ल्यांना पळता यावे यात सरकार आणि विमान कंपन्यांची भागीदारीच होती असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
-  विजय मल्ल्या यांना लंडन येथे हातकडय़ा घातल्या असून पुढील चोवीस तासांत तोंडावर बुरखा घालून त्यांना फरफटत आणले जाईल असे यशस्वी वातावरण ज्यांनी निर्माण केले ते तोंडावर आपटले आहेत. प्रत्यक्षात श्रीमान मल्ल्या हे झटपट जामीन मिळवून पुन्हा लंडनमध्ये हिंडूफिरू लागले आहेत. देशातील बँकांना आठ-नऊ हजार कोटींना चुना लावून विजय मल्ल्या पळून गेले. बँका बुडाल्या आणि मल्ल्या उडाले ते अद्यापि आमच्या हाती लागायला तयार नाहीत. सरकारने त्यांना ‘भगोडा’ घोषित केले. इंग्लंडमध्ये त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी आपण वारंवार करीत असलो तरी त्यास यश आलेले नाही. 
 
-  ‘मल्ल्यास पकडून कधी आणणार?’ असे सवाल देशात सातत्याने विचारले जात आहेत. काँग्रेस राजवटीत मल्ल्यांनी कर्ज घेतले व बुडवले, पण भाजप राजवटीत हे महाशय पळून गेले. तेव्हा सरकारी यंत्रणा झोपा काढत होती काय? पुन्हा मल्ल्या हे काही ‘मि. इंडिया’प्रमाणे अदृश्य वगैरे होऊन पळून गेले नाहीत. हिंदुस्थानी विमान कंपन्यांचा पाहुणचार घेतच ते लंडन येथे उतरले व तेव्हादेखील मल्ल्या यांच्या फसवणुकीचे प्रताप जगजाहीर झालेच होते. मग या ‘देशभक्त’ विमान कंपन्यांनी मल्ल्या यांना विमानात चढण्यापासून का रोखले नाही किंवा सरकारी तपास यंत्रणांना कळवून ‘राष्ट्रीय’ इमानदारीचे कर्तव्य का पार पाडले नाही? 
 
- शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड प्रकरणात विमान कंपन्या ‘बंदी’ हुकूम बजावतात व देश बुडवणाऱ्या मल्ल्यांना पळून जाण्यास मदत करतात. जणू काही मल्ल्यांना पळता यावे यात सरकार आणि विमान कंपन्यांची भागीदारीच होती. देशाला नऊ हजार कोटींना फसवणाऱ्यांपासून धोका नाही, पण न्याय्य हक्कांसाठी जाब विचारणाऱ्यांपासून राष्ट्रीय सुरक्षा आणि आमच्या अर्थव्यवस्थेस भलताच धोका निर्माण झाला आहे. मल्ल्या सापडत नाहीत, सापडले तर इकडे आणता येत नाही, दाऊदला पकडता येत नाही, कुलभूषण जाधवांची फाशी आणि पाकिस्तानची मुजोरी रोखता येत नसली तरी आमचे आंतरराष्ट्रीय धोरण आणि दाबदबाव संपूर्णपणे यशस्वी झालेत असेच म्हणावे लागेल, विजय मल्ल्या प्रकरणात सरकारचे हसे झाले आहे काय यावर आम्ही पामर काय बोलणार! मल्ल्या म्हणे स्वतःच मध्य लंडन पोलीस ठाण्यात हजर झाले व तिथेच अटक दाखवून लंडन पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
 
-  आमच्या देशात आसाराम बापूला जामीन मिळत नाही, आडवाणीसारख्यांच्या डोक्यावर अयोध्या खटल्याची टांगती तलवार ठेवली जाऊ शकते. कुणाला सोडायचे व कुणाला सडवायचे हे कायद्याच्या चौकटीत बसवले जाते व यालाच आमच्याकडे कायद्याचे राज्य म्हणतात, पण नऊ हजार कोटींचा ‘भगोडा’ मात्र लंडनला अटकेचे नाट्य घडवून सुटतो. मल्ल्यांची अटक व सुटका म्हणजे ठरवून लिहिलेली पटकथा तर नसावी ना, या शंकेला वाव आहे. कारण या कायदेशीर प्रक्रियेद्वारा हिंदुस्थानातील प्रत्यार्पणाला मल्ल्यानी एकप्रकारे रोखण्याचाच डाव टाकला असे काही कायदेतज्ञ सांगत आहेत. शिवाय ‘प्रकरण न्यायप्रविष्ट’ झाल्याने इतरही अनेक कायदेशीर पर्याय मल्ल्यांसाठी खुले होऊ शकतात. पुन्हा खालच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात जाण्याचा मार्ग आहेच. या सर्व गोष्टींचा पुरेपूर वापर करून हा खटला बराच काळ चालू ठेवण्याचा प्रयत्न मल्ल्यांना करता येईल. साहजिकच तेवढे त्यांचे प्रत्यार्पण लांबेल. तेव्हा विजय मल्ल्यांची ब्रिटनमधील अटक व सुटका म्हणजे एक सोहळाच ठरला. अशा सोहळ्यातच देश रमला आहे. मल्ल्या जणू बीअरचा ग्लास ओठाला लावत लंडनच्या पोलीस ठाण्यात गेले. तिथे सगळ्यांनी मिळून ‘चिअर्स’ केले, पण बीअरचा उत्साही फेस मात्र इकडच्यांच्या तोंडाला आला. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए! मल्ल्यांच्या औटघटकेच्या अटकेचे श्रेय जे घेत आहेत त्यांनी ‘सुटके’चे श्रेयसुद्धा घ्यावे.

Web Title: Why did "patriotic" airlines not prevent Mallya from boarding the plane? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.