‘शिवाजी पार्कवर ध्वनिक्षेपकाची परवानगी का दिली?’
By Admin | Published: January 19, 2017 06:04 AM2017-01-19T06:04:18+5:302017-01-19T06:04:18+5:30
रथयात्रेदरम्यान ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिल्याने संबंधित पोलिसांवर काय कारवाई केलीत? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.
मुंबई : शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्रात’ मोडत असतानाही गेल्या शनिवारी-रविवारी येथ आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेदरम्यान ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिल्याने संबंधित पोलिसांवर काय कारवाई केलीत? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. २३ जानेवारीपर्यंत सरकारला यासंदर्भात उत्तर देण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले.
‘शांतता क्षेत्रात’ ध्वनिक्षेपक वापरू नयेत, असा निर्णय उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. तसेच राज्य सरकारनेही काही दिवसांपूर्वीच अधिसूचना काढून ध्वनिप्रदूषण नियमांच्या अधीन राहूनच ‘शांतता क्षेत्रा’त ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिली जाईल, असे म्हटले आहे. नियमानुसार, शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावले जाऊ शकत नसतानाही शिवाजी मैदान पोलीस ठाण्याने जग्गनाथ रथयात्रेच्या आयोजकांना ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विकॉम ट्रस्टने अर्जाद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यावर न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने पोलिसांवर काय कारवाई केलीत? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली. ‘संबंधितांवर काय कारवाई केलीत ते सोमवारपर्यंत सांगा. आम्हीही त्यांच्यावर अवमानाची कारवाई करू,’ असे म्हणत खंडपीठाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)