...म्हणून संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली; 'त्या' निवडणुकीत काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 05:09 PM2024-04-02T17:09:49+5:302024-04-02T17:10:24+5:30
loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची विशेष मुलाखत एका मराठी चॅनेलनं घेतली. त्या मुलाखतीत शिवसेना सोडण्यामागं नेमकं काय घडामोडी घडल्या त्याचा उलगडा केला आहे.
मुंबई - Sanjay Nirupam on Shivsena ( Marathi News ) जर बाळासाहेबांनी मला मदत केली असती तर २००४ ची निवडणूक मी जिंकलो असतो, काँग्रेस उमेदवारासाठी बाळासाहेबांनी तडजोड केली. शिवसेनेसाठी इतकं झटूनही पक्षनेतृत्वानं तडजोड केल्याची खंत माझ्या मनात होती त्यामुळे मी शिवसेना सोडली असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. निरुपम हे एकेकाळी शिवसेनेचे कडवट नेते होते.
संजय निरुपम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हयात असताना मी शिवसेना सोडण्यामागे एक कारण होतं, २००४ ची लोकसभा निवडणूक मी लढलो होतो. सुनील दत्त काँग्रेसचे उमेदवार होते. तेव्हा मराठी भागात काहीतरी नकारात्मक प्रचार सुरू होता. तेव्हा मी बाळासाहेबांना या भागात तुम्ही प्रचारसभा घ्या म्हटलं, त्यांनी ठीक आहे घेतो बोलले आणि घेतली नाही. ज्या मतदारसंघात अडीच तीन लाख मतांनी सुनील दत्त निवडून येत होते. तिथे २००४ च्या निवडणुकीत केवळ ३८ हजार मतांनी जिंकले. जर साहेबांनी मदत केली असती तर ती जागा निवडून आलो असतो ती खंत माझ्या मनात होती असं त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या कार्यक्रमात निरुपम यांनी हा किस्सा सांगितला.
तसेच त्यानंतरच्या काळात कुणीतरी मला सांगितलं, सुनील दत्त निवडणुकीपूर्वी बाळासाहेबांना भेटले होते, ही माझी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही मदत करा असं त्यांनी बाळासाहेबांना पाय पकडून सांगितलं होतं. मग मला बळी का बनवलं? तेव्हा मी शिवसेनेत खूप जोरात लोकांच्या प्रश्नावर लढत होतो. शिवसेनेसाठी कष्ट घेत होतो. मग मी इतकं करताना पक्षाचे नेतृत्व तडजोड करतो त्याचा उपयोग काय आहे? मग काय करणार, त्यानंतर आणखी २-३ विषय घडले, एका प्रकरणात मला माफी मागायला सांगितली त्यामुळे आता खूप झालं, मी निघतो सांगत बाळासाहेबांकडे जावून त्यांच्या हातात राजीनामा दिला होता. कुणीही नेता मग ते राज ठाकरे, नारायण राणे, भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या हातात राजीनामा दिला नव्हता हे माझं चॅलेंज आहे. मी बाळासाहेबांच्या हाती राजीनामा दिला तेव्हा बाजूला जगदंबेची मूर्ती होती. तेव्हा हे जगदंबा याला सुदबुद्धी दे, तू घरी जा, एक आठवड्यानंतर ये असं सांगितले. तेव्हा उद्धव ठाकरे अमेरिकेत होते असं निरुपम यांनी म्हटलं.
काँग्रेस नेते संजय निरुपम हे गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहेत. महाविकास आघाडीने मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे निरुपम नाराज असून त्यांनी ७ दिवसांत निर्णय घेऊ असं विधान केले आहे. त्यात निरुपम यांनी या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले.